esakal | टपाल, बँकांमधील आधार केंद्र सुरू राहणार

बोलून बातमी शोधा

Aadhar Card
टपाल, बँकांमधील आधार केंद्र सुरू राहणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयातील आधार केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु टपाल विभाग आणि बँकांमधील आधार केंद्र सुरू राहतील. त्यामुळे नागरिकांना आधार नोंदणी आणि त्रुटी दूर करण्याची कामे करणे शक्य होणार आहे.

सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी आधारकार्डची मागणी केली जाते. परंतु काही नागरिकांकडे आधारकार्ड नाही. तसेच, काही नागरिकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्यामुळे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयातील आधार केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, टपाल कार्यालये आणि काही बँकांमधील आधार केंद्र सुरू आहेत. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना पूर्वनियोजित वेळ घेऊन आधार नोंदणी आणि दुरुस्तीची कामे करणे शक्य होणार आहे.

या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (यूआयडीएआय) संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर वेळ आरक्षित केल्यास त्यानुसार टपाल विभाग किंवा बँकेत जाऊन नागरिकांना आधारविषयक कामे करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

अशी करा पूर्वनियोजित वेळ आरक्षित -

पूर्वनियोजित वेळ आरक्षित करण्यासाठी ‘यूआयडीएआय’च्या appointments.uidai.gov.in/bookappointment या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यावर शहराचा उल्लेख करून घराजवळील टपाल कार्यालय किंवा बँकेतील केंद्राची निवड करावी. नवीन आधार नोंदणी,आधारकार्डला मोबाइल क्रमांक लिंक करणे, आधारकार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग यामध्ये चूक झाली असल्यास दुरुस्त करणे, बायोमेट्रिक अद्ययावत करणे ही कामे आधार केंद्रांवर करण्यात येत आहेत.

टोल फ्री क्रमांक - 1947

टोल फ्री क्रमांकावर केंद्राची माहिती :

आधार केंद्रांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर संपर्क साधून नागरिकांना घराजवळील आधार केंद्रांची माहिती मिळवता येईल.