‘आयुष्यमान भव’चा गुरुवारी पहिला भाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

हृदयरोगावर उपचार करण्यापेक्षा तो होणार नाही यासाठी त्याला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही हृदयाची काळजी घ्या. पर्यायाने हृदय तुमच्या शरीराची काळजी घेईल. 
- डॉ. परवेझ ग्रॅंट, संचालक, रुबी हॉल क्‍लिनिक 

पुणे - धावपळीची जीवनशैली, असंतुलित आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण अशा अनेक घटकांमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या उद्‌भवताना दिसत आहेत. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेतल्यास या सर्व समस्यांपासून थोडे लांब राहणे शक्‍य आहे. याच विचारातून ‘आयुष्यमान भव’ कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे वेस्टएंड’ यांनी ‘आयुष्यमान भव’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून पुणेकर आणि तज्ज्ञ डॉक्‍टर यांना एकत्र आणले जाणार आहे. या मालिकेतील पहिला भाग येत्या गुरुवारी (ता. २५) संध्याकाळी साडेपाच वाजता कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. रुबी हॉल क्‍लिनिकचे संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रॅंट या कार्यक्रमामध्ये ‘हृदयरोग उपचारातील आधुनिक पद्धती आणि हृदयरोगविषयी घ्यायची काळजी’ याविषयी मार्गदर्शन करतील. डॉ. ग्रॅंट यांच्याशी डॉ. ऋतुपर्ण शिंदे संवाद साधतील. 

अप्पा बळवंत चौकातील ‘रसिक साहित्य’ येथे कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील ‘नावडीकर म्युझिकल्स’ येथेही प्रवेशिका मिळतील. शिल्लक प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aayushman Bhav Event Parvez Grant