"आबा महाजन गिर्यारोहण क्षेत्रातील क्षितिज'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

"महाजन यांच्या नावाने पुरस्कार'
""भावी गिर्यारोहकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाजन यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येईल. तसेच मुंबईप्रमाणे पुण्यातदेखील गिर्यारोहण संमेलन घेण्यात येईल. याबाबतचा निर्णय लवकरच होईल,'' अशी घोषणा गिरिप्रेमींचे उमेश झिरपे यांनी केली.

पुणे : ""आबा मूल्यधिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते सतत मार्गदर्शक म्हणून आपल्यात राहतील. आबा म्हणजे सिंहगड असे समीकरणच झाले आहे. त्यांच्या जाण्याने दुसरा सिंहगड हरपला असेच वाटते. ते गिर्यारोहण क्षेत्रातील एक क्षितिज होते,'' अशी हृद्य भावना रविवारी गिर्यारोहक परिवारात उमटली.
पुणे माउंटेनियर्सतर्फे ज्येष्ठ गिर्यारोहक नारायण कृष्ण ऊर्फ आबासाहेब महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी झालेल्या सभेत गिर्यारोहकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. माउंटेनियर्सचे सरचिटणीस ज्योतिकुमार कुलकर्णी, उपाध्यक्ष विजय देवधर, गिरिप्रेमीचे उमेश झिरपे, रेडक्रॉसचे आर. व्ही. कुलकर्णी, उषा पागे, डॉ. सुरेश कुलकर्णी आणि सहकारी उपस्थित होते.

देवधर म्हणाले, ""52 वर्षांचा सवांद संपला. आबांनी विशेष मुले, मुली आणि समाजातील विविध गटांना ट्रेकिंग करवून आणले. सरांकडून ट्रेकिंगबाबत आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले. ट्रेकिंगच्या शिस्त आणि सुरक्षेबाबत ते अत्यंत आग्रही असायचे. कठीण मोहिमा यशस्वी करण्यासाठी त्याचा फायदा झाला.''
""सर माझे दीपस्तंभ आहेत. ते मनाने आणि शरीराने कणखर होते,'' असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले, तर पागे म्हणाल्या,""सिंहगड आणि आबांचे अतूट नाते निर्माण झाले होते. गिर्यारोहकांसाठी दोन सिंहगड होते. त्यापैकी आबा एक होते. आता एक सिंहगड काळाच्या पडद्याआड गेला. ट्रेकिंग हेच त्यांचे जीवन होते. या क्षेत्रातील मूल्यांनी ते सतत आपल्यात राहतील.''
गिरिप्रेमींसामोर आदर्श निर्माण करणारे आबा निसर्गाकडून सतत काहीतरी शिकणारे होते. आरोग्याला पोषक असणारा छंद जोपासला पाहिजे, ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्याचा वारसा चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली, अशा भावना महाजन यांच्या काही सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या वेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संगीता धावडे यांनी सूत्रसंचालन केले.
.......
"महाजन यांच्या नावाने पुरस्कार'
""भावी गिर्यारोहकांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाजन यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येईल. तसेच मुंबईप्रमाणे पुण्यातदेखील गिर्यारोहण संमेलन घेण्यात येईल. याबाबतचा निर्णय लवकरच होईल,'' अशी घोषणा गिरिप्रेमींचे उमेश झिरपे यांनी केली.
 

Web Title: aba mahajan is a horizon in mountaineering