काँग्रेस नेत्यांच्या सोडचिठ्ठीचा आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

ढोल-ताशांचा दणदणाट.. बॅण्डची सुरेल सुरावट... अशा वातावरणात नागरिकांना साखरेचे वाटप करून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी पुढील फळीतील कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आनंदोत्सव साजरा केला. ‘गयारामांचा, दलबदलूंचा निषेध असो’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट.. बॅण्डची सुरेल सुरावट... अशा वातावरणात नागरिकांना साखरेचे वाटप करून पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी पुढील फळीतील कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आनंदोत्सव साजरा केला. ‘गयारामांचा, दलबदलूंचा निषेध असो’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

अभिनव चौकातील कै. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ सकाळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला होता. ढोल-ताशाचे पथक आणि बॅण्ड लावून पक्ष सोडून चाललेल्या नेत्यांबद्दल आनंद व्यक्त केला. ‘बाय बाय कटप्पा’... ‘मतदारांनी पण ठरवले, दलबदलूंना पाडायचे’ अशा आशयाचे बॅनर आणि पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. या वेळी कै. वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते पुष्पहार घातला. नंतर नागरिकांना साखरेचे वाटप केले.

माने म्हणाले, ‘‘आम्ही निःस्वार्थीपणे काँग्रेसचे काम केले, भविष्यातही करत राहणार आहे. पदाची अपेक्षा नाही. काँग्रेसला आज सच्च्या कार्यकर्त्यांची गरज आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांमुळे नवीन कार्यकर्त्यांना जरूर संधी मिळेल.’’

संजय बालगुडे, शांतीलाल सुरतवाला, रामदास मारणे, ऋषिकेश बालगुडे, बाबू पडळकर, राजेंद्र मासुळे, रूपेश परदेशी, सुकदेव शिंदे, अप्पा शेवाळे, बाळासाहेब शिवरकर, मिलिंद काची, प्रकाश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव संजय बालगुडे यांनी संयोजन  केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhinav chowk pune Celebration of Congress leaders release