अभिनवमध्ये रंगला अनोखा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

भक्तीमय वातावरणात ऑनलाइन पालखी सोहळा साजरा करून विठू माउलीला कोरोना नष्ट व्हावा आणि संकटातून बाहेर काढावे, अशा प्रकारचे साकडे घातले.

धनकवडी (पुणे) : शिक्षकांनी  फुलांनी सजवलेली माउलीची पालखी...पारंपरिक पोशाख...कानडा राजा पंढरीचा...माझे माहेर पंढरी...हेची दान देगा देवा...॥अशा प्रकारचे अभंग गात अखंड विठू नामाचा गजर करत भक्तीमय वातावरणात ऑनलाइन पालखी सोहळा साजरा करून विठू माउलीला कोरोना नष्ट व्हावा आणि संकटातून बाहेर काढावे, अशा प्रकारचे साकडे घातले. आंबेगाव बु. येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ऑनलाइन पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा साजरा केला पण ऑनलाइन. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक राजीव जगताप आणि सेक्रेटरी सुनीता जगताप यांच्या हस्ते पांडुरंगाची पाद्यपूजा करून विठू माउलींच्या आरतीने झाली. त्यानंतर संगीत शिक्षकांनी विविध अभंग सादर करून भक्तिभावाने विठू माउलीला साद घातली. पार्थ गरुड यांनी गायलेल्या 'माझे माहेर पंढरी', या अभंगाला ऑनलाइन आणि फेसबुक लाईव्हद्वारे उपस्थित असलेल्या पालकांनी  भरभरून प्रतिसाद दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"अभिनव स्कूलने या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाइन पालखी सोहळा साजरा करून संगीत शिक्षकांनी सादर केलेल्या विविध अभंगांमधून साक्षात विठू माउलीचे दर्शन घडवले त्याचबरोबर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोरोना मुळापासून नष्ट होण्यासाठी साकडेही घातले," अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली, तर आम्ही सर्व विद्यार्थी शाळा आणि शाळेतील ऍक्टिव्हिटी मिस करतोय, अशी भावना व्यक्त केली.

ऑनलाइन अभंगवाणीसाठी संगीत विभाग प्रमुख बिपीन इथापे, संगीत शिक्षक आनंद चोरघे, विठ्ठल ढमाळ, सिद्धेश भोयर आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांविना साजऱ्या झालेल्या ऑनलाइन पालखी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पवार यांनी  केले. यावेळी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhinav school celebrate online palkhi sohala