Lockdown Effect : फक्त ३० टक्केच हॉटेल्स सुरू; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सद्यस्थिती

सनील गाडेकर
Thursday, 5 November 2020

गेल्या पाच ऑक्‍टोबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट केवळ पार्सल सेवेपुरती मर्यादित होती. त्यानंतर हॉटेल जेवणास खुली करून एक महिना पूर्ण झाला आहे.

पुणे : मिशन बिगीन अगेन अंतर्गत परवानगी मिळाल्याने शहरातील अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहे. त्यात हॉटेल व्यवसायासाठी सध्या सकारात्मक परिस्थिती आहे. मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याची भीती आणि कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक झटक्‍यातून न सावरल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 70 टक्के हॉटेल्स अद्याप बंदच आहेत.

माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक अन् सुटका

गेल्या पाच ऑक्‍टोबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट केवळ पार्सल सेवेपुरती मर्यादित होती. त्यानंतर हॉटेल जेवणास खुली करून एक महिना पूर्ण झाला आहे. या काळात केवळ 30 टक्केच हॉटेल सुरू झाली आहेत. त्यातील व्यवसाय हा कोरोना पूर्वीच्या तुलनेत 40 टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, विमाननगर, मगरपट्टा, खराडी आणि कल्याणीनगर अशा आयटी परिसरातील अनेक हॉटेल्स आजही बंद आहेत.

सध्या 50 टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अडीच लाखांपैकी 80 ते 90 हजार कर्मचारी कामावर हजर आहेत. हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास व्यवसायाचे प्रमाण आणि कामगारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ हजार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधून दरवर्षी 500 ते 600 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यातील सुमारे 30 टक्के उलाढाल आता सुरळीत झाली आहे, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशनकडून देण्यात आली.

'देवाच्या काठीला आवाज नसतो पण..' : अर्णब प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांचा टोला

यामुळे हॉटेल आहेत बंद :
- ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याची भीती
- लॉकडाऊन काळात झालेले आर्थिक नुकसान
- केवळ 50 टक्के व्यवसाय सुरू करण्याची परवानगी
- आयटी भागात कर्मचाऱ्यांना दिलेले वर्क फॉर्म होम
- पुन्हा हॉटेल सुरू करण्यासाठी नसलेले भांडवल

या आहेत व्यावसायिकांच्या मागण्या :
- रात्री दीडपर्यंत हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी द्यावी.
- कामकाजाची क्षमता 75 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावी.

बारामतीत बांधकाम व्यावसायिकांचे आंदोलन स्थगित

ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व्यवसायातील उलाढाल आता हळूहळू वाढत आहे. मात्र आजही 70 टक्के हॉटेल बंद आहेत. तर रात्री नऊनंतर गर्दी कमी होते. 50 टक्के क्षमतेनेच व्यवसाय सुरू असल्याने 30 ते 40 टक्केच कामगार ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार थांबला आहे. कामकाजाच्या क्षमतेचे प्रमाण आणि हॉटेलच्या वेळा वाढविणे गरजेचे आहे.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 30 per cent hotels in Pune and Pimpri Chinchwad are currently operational