माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक व सुटका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पुणे : मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात भाजपशी संलग्न असलेले माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच आज त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले (वय 40) यांनी  फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग 

चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी आज सकाळी काकडे दांम्पत्याला अटक करून पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. त्याचबरोबर ढमाले यांनी फिर्याद दिल्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र ही शेवाळे यांनी न्यायालयात सादर केले. अटक आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. मात्र बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर दोघांनाही प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ढमाले यांच्या वतीने ऍड. विजयसिंग ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. 

या आहेत जामिनाच्या अटी : 
- न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचे नाही
- पोलिस बोलवतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजर व्हायचे
- तपासात पोलिसांना सहकार्य करायचे
- साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही
- पत्ता व ओळखपत्राचे कागदपत्रे न्यायालयात सादर करायचे

धक्कादायक! शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड; आरोपीच्या हल्ल्यात गमावले डोळे

हा कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं व पत्नीचं साधं बोलणं देखील झालेलं नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत.-संजय काकडे, माजी खासदार

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MP Sanjay Kakade and his wife arrested and released