#EduPune शिक्षकांच्या अनुपस्थितीने विद्यार्थिसंख्या घटली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

तुमच्या मुलांच्या शिक्षणाची अशीच हेळसांड होतेय? आम्हाला What'sApp करा ९१३००८८४५९वर किंवा मेल करा Webeditor@esakal.com

सिंहगड रस्ता -  विद्यार्थ्यांकडून शाळा स्वच्छ करून घेणे, शिक्षकांचे परदेश दौरे, पदवीधर शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने हिंगण्यातील मनपा शाळेची पटसंख्या घटली आहे. 

हिंगणे येथे महापालिकेच्या दोन शाळा आहेत. यात हनुमंतराव जगताप ही ११५ मुलींची बालवाडी ते सातवीपर्यंतची आणि १६८ मुलांची पहिली ते सातवीपर्यंत अशा दोन शाळा आहेत. सकाळ सत्रातील शाळेचा पट ३२५ असून गेल्या वर्षी आणि यंदाचा जवळपास समान आहे. मात्र दुपारच्या सत्रातील शाळेचा पट अतिशय खालावला आहे. गेल्या वर्षी तो २६० होता तर यंदा तो २२० ते २२५ च्या दरम्यान आहे. 

येथील शाळेत दुपारच्या सत्रासाठी पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षकच नाहीत. दोन्ही शिक्षक सकाळच्या सत्रातच आहेत. एक शिक्षिका वरचेवर रजेवर असतात. 

मुळात शिक्षकच नसल्याने दुपारच्या सत्राच्या शाळेतील विद्यार्थी सोडून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही शिक्षक संपूर्ण वर्षभर रजेवर असल्याचेही दिसून येते. अशा शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. शिक्षण विभाग सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, या शाळेतील संबंधित वर्गातील सर्वाधिक मुलांनी शाळा सोडली आहे. खाशाबा जाधव क्रीडानिकेतन या ४ थी ते ८ वीपर्यंतच्या शाळेत १४० मुले आणि ९३ मुली असे एकूण २३२ विद्यार्थी आहेत. परंतु शाळेची पटसंख्या २५० आहे. 

क्रीडानिकेतन असल्याने शाळेची पटसंख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. कल्पना चावला इंग्लिश मीडियम शाळेत बालवाडी ते सातवीपर्यंतच्या शाळेचा पट २८३ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the absence of teachers declined the number of students