'सकाळ' बातमीचा परिणाम : खडकवासला बाह्यवळण रस्त्यासह पुलाच्या कामाला वेग 

निलेश बोरुडे
Friday, 6 November 2020

अनेक दिवसांपासून रखडलेल्या खडकवासला बाह्यवळण रस्त्याच्या कामाला वेग आला असून वाहून गेलेल्या पुलाचे कामही वेगात सुरू आहे.

किरकटवाडी : अनेक दिवसांपासून रखडलेल्या खडकवासला बाह्यवळण रस्त्याच्या कामाला वेग आला असून वाहून गेलेल्या पुलाचे कामही वेगात सुरू आहे. बाह्यवळण रस्त्याचे काम रखडल्याने व तात्पुरता तयार केलेला पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत दै. 'सकाळ'मधून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते व कामाबाबत सतत पाठपुरावा करण्यात येत होता.

हेही वाचा  : पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

खडकवासला गावातून जाणारा मुख्य रस्ता अरुंद आहे. त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे खडकवासला गावामध्ये अनेक वेळा वाहतूक कोंडीचे प्रसंग उद्भवतात. सिंहगड, खानापूर, पानशेत व इतर गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी खडकवासला बाह्यवळण रस्ता अत्यंत उपयुक्त आहे; परंतु गेल्या अनेक  महिन्यांपासून रस्त्याचे व पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. 'सकाळ'ने याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सध्या रस्त्यासह पुलाचेही काम वेगात सुरू असल्याने लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता उपलब्ध होईल असे चित्र दिसून येत आहे.

मुख्य सिंहगड रस्त्याच्या कामानेही घेतला वेग- नांदेड फाट्यापासून पुढे तब्बल दोन वर्षांपासून रखडलेले मुख्य सिंहगड रस्त्याचे काम सध्या 'स्लीप फॉर्म पेव्हर' मशीन मुळे वेगाने होताना दिसत आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ठेकेदाराकडून रात्रीच्यावेळी काम करुन घेतले जात आहे.

हेही वाचा : बारामतीत एकाने सुरू केले `शोले` स्टाईल आंदोलन सुरू 

कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- ठेकेदाराने रेडी मिक्स काँक्रिट तयार करण्याचा प्लांट गोऱ्हे खुर्द या ठिकाणी उभारलेला आहे. नांदेड फाट्यापासून हे अंतर  सुमारे 15 ते 16 किलोमीटरचे आहे. तयार करण्यात आलेले कॉंक्रीट तांत्रिक दृष्ट्या 'काँक्रीट मिक्सर' द्वारे घेऊन न येता डंपर मधून आणले जात असल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे कोल्हेवाडी येथील नागरिक श्रीकांत कोल्हे यांचे म्हणणे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

खडकवासला बाह्यवळण रस्ता, त्यावरील पूल व मुख्य सिंहगड रस्ता असे सर्व काम येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. काही ठिकाणी आवश्यक असलेली वन विभागाची परवानगी मिळविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही ठेकेदाराला योग्य सूचना देण्यात आलेल्या असून गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अश्विनी भुजबळ, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acceleration of bridge work along Khadakwasla bypass road