विद्यार्थिनीच्या दुचाकीला स्कूलव्हॅनने पाठलाग करून दिली धडक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

आळंदीतील एमआयटी महाविद्यालयात संबंधित विद्यार्थीनी शिकत आहे. महाविद्यालयातून सुटल्यानंतर आळंदीजवळील केळगाव येथे घरी जात असताना तिचा पाच जणांनी स्कूलव्हॅनद्वारे देहूफाटा चौकातून पाठलाग केला. तिची गाडी इंद्रायणी नदीवरील नविन पूलावर आल्यानंतर त्यांनी तिला कट मारला आणि पुन्हा वेगाने तिच्या घराकडे गेले.

आळंदी : दूचाकीद्वारे महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या केळगावच्या अठरा वर्षीय विद्यार्थींनीचा स्कूलव्हॅनने सिनेस्टाईल पाठलाग करून धडक देत तिला मंगळवारी (ता.३) गंभीर जखमी केले. आळंदी पोलिसांनी  अपघाताची नोंद करून एकावर गुन्हा दाखल करत सोपास्कार पूर्ण केला.मात्र सदरची घटना केवळ छेडछाड करण्याच्या उद्देशाने घडवली असून पोलिसांनी आरोपींना वाचविण्यासाठी केवळ अपघाताचाच गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप विद्यार्थीनीच्या आजोबांनी केला आहे.

आळंदीतील एमआयटी महाविद्यालयात संबंधित विद्यार्थीनी शिकत आहे. महाविद्यालयातून सुटल्यानंतर आळंदीजवळील केळगाव येथे घरी जात असताना तिचा पाच जणांनी स्कूलव्हॅनद्वारे देहूफाटा चौकातून पाठलाग केला. तिची गाडी इंद्रायणी नदीवरील नविन पूलावर आल्यानंतर त्यांनी तिला कट मारला आणि पुन्हा वेगाने तिच्या घराकडे गेले. यावेळी केळगाव आळंदी रस्त्यावर विद्यार्थीनी दुचाकीवरून घरी जात असताना सिनेमास्टाईलने स्कूलव्हॅन तिच्या गाडीला समोरासमोर आडवी मारली.यावेळी भेदरलेल्या विद्यार्थीनीच्या गाडीला स्कूलव्हॅनची जोरात धडक बसली.या अपघातात तिचा उजव्या हाताचे मनगटला आणि तोंडाला जोरदार मार लागला. अपघातानंतर संबंधित आरोपींनी तिला त्याच व्हॅनमधे बसवून उपचारासाठी नेत असल्याचे भासविले. मात्र स्थानिक तरूणांनी आणि मुलीच्या आजोबांनी आळंदीत सदरची व्हॅन पकडली आणि आऱोपींना चोप दिला. तर काहींनी जखमी अवस्थेतील विद्यार्थीनीला भोसरी येथे उपचारासाठी नेले.यावेळी तिच्या उजव्या हाताचे आणि नाकाचे ऑपरेशन करण्यात आले.

दरम्यान याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात विचारले असता जमादार महेश साळूंके यांनी सांगितले की, पाठलाग केल्याची माहिती चुकीची असल्याची खात्री पोलिसांनी केली आहे.दरम्यान आळंदी पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची तक्रार दाखल केली असून यात आसिफ अन्सार मुल्ला(वय-२१,चोविसवाडी,ता.हवेली)याला आज अटक केली आहे.सदर आरोपी हा स्कूल व्हॅन चालवित असून चाकणला शाळेतील मुले सोडण्यासाठी जात होता.त्यानंतर आळंदीला येताना सदरच्या विद्यार्थीनीच्या गाडीला धडक दिली.आणि आरोपीनेच रूग्णालयात मुलीला उपचारासाठी दाखल केले.अधिक तपास आळंदी पोलिस करत आहे.

आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की,याबाबत संबंधित मुलीचा पुरवणी जबाब घेवून शहानिशा केली जाईल.

Web Title: accident in alandi