मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात; चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात; चालकाचा मृत्यू

पुणे (खेड) : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका अवघड वळणावर रसायन वाहू टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकून पडल्याने चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर खेड पोलिस, कशेडी वाहतूक पोलीस आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी क्रेनच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांतचालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टँकर चालक वशीम हा आपल्या ताब्यातील टँकर ( क्रमांक : एम. एच. ०४. जे. के. ७७१७ ) घेऊन गुजरात राज्यातील वापी येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रसायन घेऊन निघाला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो महामार्गावरील कशेडी घाट उतरत असताना आंबा स्टॉप येथील अवघड वळणावर त्याचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो टँकर गटारात पलटी झाला. या अपघातात चालक वशीम हा केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची खबर मिळताच कशेडी वाहतूक पोलीस टॅप चे सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत बोडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची खबर खेड पोलिसांना मिळताच खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्याचे सहकारीही कशेडी घाटात पोहचले. टॅंकरचा चालक वशीम याचा केबिनमध्ये अडकलेला मृतदेह काढण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले. अपघातस्थळी क्रेन आल्यानंतर पोलीस व मदत ग्रुपच्या सदस्यांनी क्रेनच्या सहाय्याने सुमारे दोन तास प्रयत्न करून चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

या टँकर मधीलहायड्रोक्लोरिक ॲसिड हे ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टळला असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अपघातस्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

loading image
go to top