अपघाती मृत्यू घटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

शहरात रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदा २५ टक्‍क्‍यांनी कमी झाले. २०१८ च्या जानेवारी ते एप्रिल  या काळात ९२ जण अपघातात दगावले; तर यंदा ६९ जणांचा मृत्यू झाला. पालिका व पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काहींचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.

पुणे - शहरात रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदा २५ टक्‍क्‍यांनी कमी झाले. २०१८ च्या जानेवारी ते एप्रिल  या काळात ९२ जण अपघातात दगावले; तर यंदा ६९ जणांचा मृत्यू झाला. पालिका व पोलिसांच्या प्रयत्नांमुळे काहींचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यापासून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आदेश वाहतूक शाखेला दिले होते. त्यादृष्टीने वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरवात केली होती. वाहतूक शाखेने अपघातांची ठिकाणे निवडली. त्यामागील कारणे शोधली. महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्यास बैठकांमध्ये सांगितले होते. त्यानुसार पालिकेने अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये बदल करण्यास सुरवात केली होती. 

दरम्यान, पोलिसांनी गेल्या वर्षीच्या व या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांतील अपघातांमधील मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी शुक्रवारी जाहीर केली. त्यामध्ये गेल्या वर्षी पहिल्या चार महिन्यांत २८६ अपघात झाले. त्यातील ८७ अपघातांमध्ये ९२ जणांनी जीव गमावला होता. यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत २३७ अपघात झाले. त्यामध्ये ६८ प्राणांतिक अपघात होऊन त्यात ६९ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम म्हणाले, ‘‘मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात घटली. वाहतूक शाखा, महापालिका प्रशासन व प्रसार माध्यमांच्या विशेष प्रयत्नांमुळे काही जणांचे प्राण वाचवू शकलो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Death Decrease