Pune News ...अन्‌ ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर थिरकायला लावणाऱ्यांच्या अपघाताने जेव्हा चुकला काळजाचा "ठोका' !

ढोल-ताशा वादन पथकावर काळाचा घाला, ढोल ताशा महासंघाने दिला आधार
accident of Bajiprabhu Dhol Tasha Pathak police hospital mumbai pune
accident of Bajiprabhu Dhol Tasha Pathak police hospital mumbai puneesakal

पुणे : वीर बाजीप्रभु ढोल - ताशा पथकातील वादक शुक्रवारी रात्री पिंपळे गुरवमधील एका कार्यक्रमासाठी आले. सायंकाळनंतर तब्बल तीन-चार तास त्यांनी बेभान वादन केले, अनेकांना ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर ताल धरायला लावला, मनसोक्त थिरकायला भाग पाडले.

पण, हिच ढोल-ताशा वाद्य पथकातील मुले मुंबईतील गोरेगावच्या आपल्या घराच्या ओढीने परतीच्या मार्गावर निघाली, तेव्हा काळाने त्यांच्यावर झडप घातली. काही वेळापुर्वी दुसऱ्यांना आपल्या वादनाच्या ठेक्‍यावर थिरकायला लावणाऱ्या या मुलांच्या अपघाताच्या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला.

या दुर्दैवी घटनेची खबर ढोल ताशा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली, वाचलेल्या मुला-मुलींना मदतीपेक्षा रडण्यासाठी खांदा, आधार दिला अन्‌ त्यांच्या खांद्यावर हात ठेवून लढण्याचे बळ दिले !

मुंबईतील गोरेगाव येथील वीर बाजीप्रभु ढोल ताशा पथकांना कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातुन मोठी मागणी असते. गणेशोत्सव, नवरात्र असो किंवा शिवजयंती, फुले जयंती, आंबेडकर जयंती अशा महापुरुषांची जयंती उत्सव, गावगोवाच्या जत्रा, ऊरुस अशा असंख्य कार्यक्रमांसाठी त्यांच्या पथकाला चांगली मागणी होती.

पथकातील मुला-मुलींना या निमित्ताने मिळणाऱ्या पैशांमधून त्यांचा शाळा, कॉलेजचा खर्चही निघत असल्याने पथकात सहभागी होण्यास मुले कायम उत्सुक होती. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथील बुद्धभुषण विहार या मंडळाकडून ढोल-ताशा वादनासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ढोल-ताशा वादनाचा आनंद घेता येणार असल्याने मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह होता. सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याने ढोल-ताशा पथकाची मुले सायंकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले. सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत मुलांनी ढोल - ताशा वादन केले.

त्यांच्या बेभान वादनाला, उत्साहाला सहभागी नागरीकांनी मनसोक्त दाद दिली. त्यांच्या ढोल-ताशाच्या ठेक्‍यावर अनेकांची पावले थिरकली. रात्री अकरा वाजेपर्यंत वादन केल्यानंतर सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. यजमानांकडून पाहूणचार घेतल्यानंतर हि मुले रात्री पुन्हा मुंबईतील गोरेगावमधील आपल्या घराच्या ओढीने परतीच्या मार्गावर निघाले.

पण काही कळण्याच्या आतच काळाने त्यांच्यावर घाव घातला. अर्ध्या रस्त्यात असतानाच बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात काही जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले, तर काही जण गंभीर जखमी झाले. या घटनेने अक्षरशः सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.

दरम्यान, ढोल - ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सचिव संजय सातपुते, संदेश खरात, सुभाष लाडे, अनुप साठे यांनी या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याच्या दिशेने धाव घेतली. जखमी झालेल्यांपैकी फक्त एका तरुणाकडूनच त्यांनी घटनेची हकीकत ऐकायला मिळाली. ठाकूर, सातपुते व अन्य पदाधिकाऱ्यांनी या तरुणांना आधार दिला.

त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. ठाकूर म्हणाले, ""अपघाताच्या ठिकाणी त्यांना मदत करणे शक्‍य नव्हते, आता त्यांना केवळ मानसिक आधाराची गरज होती. त्यांची विचारपुस केली. त्यांना आधार दिला. खांद्यावर हात ठेवून त्यांना लढण्यासाठी बळ दिले. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी लवकरच भुमिका घेऊ.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com