खचाखच भरलेली पीएमपी बस...ब्रेक निकामी...अन्

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सकाळची काळी साडे दहाची वेळ...प्रवाशांनी खचाखच भरलेली बस कात्रज- सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गातून  लोहगावच्या दिशेने निघाली. बस भरधाव वेगाने सुरु होती.. अन् बसचे ब्रेक निकामी झाले...अपघात होणे अटळ होते. पण, तेवढ्यात चालकाने पीएमपी बस लोखंडी दुभाजकावर आदळली....चालकाच्या प्रंसगवधानामुळे मोठा अपघात टळला.

पुणे : सकाळची काळी साडे दहाची वेळ...प्रवाशांनी खचाखच भरलेली बस... कात्रज- सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गातून लोहगावच्या दिशेने निघाली. बस भरधाव वेगाने सुरु होती.. अन् बसचे ब्रेक निकामी झाले...अपघात होणे अटळ होते. पण, तेवढ्यात चालकाने पीएमपी बस लोखंडी दुभाजकावर आदळली....चालकाच्या प्रंसगवधानामुळे मोठा अपघात टळला. आज (ता.17) भारती हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली. क्रेनच्या सहाय्याने बस मार्गातून बाजूला केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली.
        

कात्रज आगाराची बस कात्रज कडून लोहगावला निघाली होती. भारती हॉस्पिटल परिसरातील उतारावर बस येताच चालक विष्णू हांडे यांना ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. मार्गावरील ईतर वाहनांना ओरडून सांगत समोर असलेल्या लोखंडी दुभाजकावर बस घातली. तीव्र उतारामुळे वेग घेतलेली बस तब्बल दहा फूट लांब अंतरातील लोखंडी दुभाजक तोडत गेली आणि थांबली. सकाळची वेळ असल्यामुळे बस प्रवाशांनी भरली होती. त्याचवेळी मार्गावर वाहतूकही मोठी होती. प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाहतूक पोलिसांनी क्रेन बोलवून बस मार्गातून बाहेर काढली. दरम्यान मंदावलेली वाहतूक सुरळीत झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of PMP bus avoided at Katraj due to driver in Pune