दरड अंगावर कोसळून ट्रेकर्सचा मृत्यू; सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ घडली दुर्घटना

'सिंहगड एपिक ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 हेमंग धीरज
हेमंग धीरजsakal

किरकटवाडी: शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ पायवाटेवर दरड कोसळण्याची घटना घडली होती. दुर्दैवाने यामध्ये एका प्रशिक्षीत ट्रेकर्सचा दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. हेमंग धीरज गाला (वय 31, रा. मित्रमंडळ चौक,पुणे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुण ट्रेकर्स चे नाव आहे. वन विभागाच्या प्राथमिक बचाव पथकाच्या (पीआरटी) जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्रीच्या अंधारात मृतदेह दरीतून बाहेर काढला.

शनिवारी 'सिंहगड एपिक ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. कल्याण गावाच्या बाजूने सर्व स्पर्धक पायवाटेने गडावर येत होते. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे होते. दाट धुके असल्याने आजूबाजूला काही दिसत नव्हते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या कल्याण दरवाजाच्या खालच्या बाजूला डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी पायवाटेने वर येत असलेल्या हेमंगच्या अंगावर मोठ-मोठे दगड आले व त्याबरोबर तो दरीत फेकला गेला. खाली काही अंतरावर या दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला.

ट्रेकची वेळ संपली तरी हेमंग घरी न आल्याने वडीलांनी फोन केला परंतु संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांनी ट्रेक सुरु झाला त्या ठिकाणी आतकरवाडी येथे जाऊन पाहिले असता हेमंगची गाडी आढळून आली. त्यांनी ट्रेकच्या आयोजकांशी संपर्क साधला व तातडीने हवेली पोलीस आणि वन विभागाला माहिती दिली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वन अधिकारी, प्राथमिक बचाव पथकाचे जवान व स्थानिकांनी बेपत्ता हेमंगचा शोध सुरू केला. तानाजी भोसले, योगेश गोपी, धनंजय सपकाळ, विश्वनाथ जावळकर,शेखर जावळकर, अमोल पटेल, ज्ञानेश्वर जावळकर,शंकर डोंगरे, रमेश खामकर,अमोल पढेर, मंगेश सांबरे यांनी दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढून कल्याण दरवाजाजवळ आणला. पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद माने, ज्ञानेश्वर बुधवंत, किशोर काळभोर,अक्षय काळे, योगेश मायनाळे व सोन्याबापू नांगरे या जवानांनी मृतदेह कल्याण दरवाजा पासून सिंहगडावरील गाडीतळाजवळ आणला. पोलीसांनी प्राथमिक पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. यावेळी खानापूर वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस नाईक गणेश धनवे, मृताचा मित्रपरिवार, नातेवाईक व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बचाव पथकालाही होता धोका कोसळलेल्या दरडीच्या खालच्या भागात हेमंगचा शोध घेण्यात येत होता. दरडीची माती व पावसामुळे खाली उतरताना आधार मिळत नव्हता. त्याचवेळी दरडीचा काही भाग अंगावर कोसळण्याचा धोका होता. अत्यंत सावधगिरीने शोधकार्य करुन मोठ्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढल्याची माहिती तानाजी भोसले या पीआरटी पथकाच्या जवानाने दिली.

अन् सिंहगडही स्तब्ध झाला.अग्निशमन दलाच्या जवानांनी हेमंगचा मृतदेह त्याच्या वडिलांना दाखविण्यासाठी गाडीतळावर बॉडी कव्हर बॅगची चैन उघडली. जखमांनी रक्ताळलेलं हेमंगचं शरिर पाहून गहिवरलेल्या वडीलांनी त्याचा हात हातात घेतला, डोक्यावरुन हात फिरवला व डोळे मिटवले. अत्यंत वेदनादायी असलेले हे दृष्य पाहताना सर्व उपस्थितांसह क्षणभर सिंहगडही स्तब्ध झाला होता.

आयोजकांच्या लक्षात कसे आले नाही? सहभागी स्पर्धकांची पुर्वनोंदणी करण्यात आली होती. तसेच प्रत्येकाला क्रमांक देण्यात आलेले होते . ज्या मार्गावरून ट्रेकर्स जाणार होते त्याच मार्गावर दरड कोसळलेली असताना आयोजकांनी सर्व स्पर्धक परतले की नाही याची खातरजमा का केली नाही? हेमंग बेपत्ता असल्याचे आयोजकांच्या लक्षात कसे आले नाही? आयोजकांच्या अशा हलगर्जीपणामुळे शोधकार्य अत्यंत उशिरा सुरू झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com