सावधान! पिंपरीत सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सर्वाधिक अपघात

मंगेश पांडे  
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत २०१९ या वर्षात २७१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ३९१ गंभीर व १०३ किरकोळ जखमी झाले आहेत.

पिंपरी - वाहनचालकांच्या चुका, खराब रस्ते, वाहतूक नियमांचे उल्लंघन, यामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षात ७२१ अपघातांची नोंद झाली. या अपघातांत सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सर्वाधिक १४१ अपघात झाले असून, त्यात ५४ जणांचा मृत्यू, ६४ जण गंभीर व २३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे सायंकाळनंतरची वेळ वाहनचालकांसह नागरिकांसाठीही कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत २०१९ या वर्षात २७१ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ३९१ गंभीर व १०३ किरकोळ जखमी झाले आहेत. हेल्मेट घालण्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती केली जात असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एकूण अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि खराब रस्ते अपघाताला कारण ठरत आहेत. मोठमोठे खड्डे, अमानांकित गतिरोधक, रस्त्यावरील बारीक खडी, यामुळे अपघात होत आहेत. रात्री खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खडीवर वाहन घसरून झालेल्या अपघातांतही जिवावर बेतत आहे. 

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

उपाययोजना
    वाहन परवाना निलंबनाची अधिकाधिक कारवाई
    शाळा, महाविद्यालय, कंपन्यांसह विविध संस्थांत जाऊन वाहतूक नियमांबाबत प्रबोधन 
    मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी २०१८ मध्ये ३१८ जणांवर कारवाई
    २०१९ मध्ये तब्बल तीन हजार २४१ जणांवर कारवाईचा बडगा
    विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या १४ हजार ६६९ चालकांवर कारवाई 
    रिक्षाचालकांसाठी कार्यशाळा व कोपरा सभा घेऊन प्रबोधन 
    ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी पत्रव्यवहार 
    अपघातप्रवण क्षेत्रात फलक बसविण्यासह गतिरोधकांची उभारणी
    रस्तेदुरुस्तीसह साइडपट्टी भरणे, रुंदीकरणाबाबत संबंधितांना पत्रव्यवहार
    वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे 

वेगच कारणीभूत
एकूण अपघातांमध्ये अतिवेगात वाहन चालविल्याने झालेल्या अपघातांची संख्या अधिक आहे. २०१९ या वर्षात भरधाव वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात तब्बल १९९ जणांचा मृत्यू झाला, तर ११५ जण गंभीर जखमी झाले असून, ३१ जण किरकोळ जखमी झाले आहेत.  

घाई बेतते जिवावर
अपघातामध्ये कुटुंबातील कमविणारी व्यक्ती गेल्यास संपूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. यासाठी वाहन चालविताना चालकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. वाहतूक नियम पाळले जात नाहीत. सिग्नल तोडण्याबरोबर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातूनही अनेकदा अपघात होतात. अतिघाई चालकांच्या जिवावर बेतत आहे.

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक 
२०१९ या वर्षात झालेल्या दुचाकींच्या एकूण अपघातांत १०३ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. १४५ दुचाकीचालक गंभीर आणि ३५ किरकोळ जखमी झाले. दुचाकीवर मागे बसलेल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला असून, ३८ जण गंभीर व नऊ किरकोळ जखमी झाले आहेत. यासह कार, टॅक्‍सी व इतर वाहनांच्या अपघातात वीस चालकांचा मृत्यू, ३१ जण गंभीर जखमी व २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. पंधरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ३४ जण गंभीर जखमी व १५ किरकोळ जखमी आहेत. 

शहरातील ‘ब्लॅक स्पॉट
निगडीतील भक्ती-शक्ती चौक      
भोसरीतील धावडेवस्तीतील रस्ता    
चिंचवड लोकमान्य रुग्णालय पुलाजवळील रस्ता    
जगताप डेअरी चौक     
औंध रुग्णालयासमोरील रस्ता   
दिघी-मॅगझीन चौक   
चाकण घाट    
मरकळ रोड    
बावधन येथील चांदणी चौक वाकड पूल         
खालुंब्रे येथील रस्ता       
आळंदी फाटा   
तळेगाव रेल्वे स्टेशन चौक         
सोमाटणे फाटा       
मामुर्डी नाका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of 219 persons in 2019 years in Pimpri-Chinchwad Police Commissioner