डॉक्‍टरांनी उपचार नाकारल्याने बारामतीत अपघातग्रस्ताचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

कुटुंब उघड्यावर
पोलिसांनी या प्रकरणी सूर्यकांत सतीश पवार (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) या चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसले हे सुरक्षारक्षक होते. कामावरून परतत असताना अपघात झाला. त्यांच्यामागे आईवडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

सोमेश्वरनगर - एरवी ज्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिले जाते, तेच आज एका तरुणासाठी काळ ठरले. पणदरे (ता. बारामती) येथे झालेल्या अपघातातील या जखमी तरुणाला शिक्षकाने तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्‍टरांनी उपचारास नकार दिल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरा-बारामती रस्त्यावर पणदरे येथे शुक्रवारी सकाळी नीरेकडून बारामतीला निघालेल्या चारचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक बसली. दुचाकीस्वार सतीश आत्माराम भोसले (रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) जबर जखमी झाले. त्याचवेळी शेतात निघालेले सोमेश्वर इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक योगेश पवार व त्यांचे वडील रामदास पवार तेथे पोचले. जखमीला चुकवत काही चारचाकी पुढे निघून जात होत्या. पवार पिता-पुत्रांनी त्यातील एकाला थांबवत जखमीला मागील सीटवर बसविले. पणदरे पोलिस चौकीत कुणी नसल्याचे पाहून १५ मिनिटांत बारामतीतील खासगी रुग्णालय गाठले.

पानिपत पराभवाचा नाहीतर शौर्याचा इतिहास : गोवारीकर

तेथे डॉक्‍टरांनी ‘हे नातेवाईक आहेत का तुमचे’ असा प्रश्न केला. त्यावर योगेश यांनी ‘आम्ही यांना ओळखत नाही, रस्त्यावरून उचलून आणलंय’ असे उत्तर दिले. तेव्हा डॉक्‍टरांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. प्रथमोपचारही केले नाहीत. पुढच्या दहा मिनिटांत पवार पिता-पुत्रांनी जखमीला घेऊन दुसरे रुग्णालय गाठले. तेथे सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला मिळाला. अखेर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय गाठले. तेथे डॉक्‍टरांनी त्वरित उपचार सुरू केले, मात्र पाचच मिनिटांत जखमीची जगण्याची धडपड संपली. साडेसहा ते आठपर्यंत प्रचंड रक्तस्राव झाल्याने गाडीचे मागील सीट रक्ताने माखले होते.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले की, पेशंट येणार हे समजताच यंत्रणा तयार ठेवली होती, पण उशीर झाला. ही असंवेदनशीलता योग्य नाही.

जखमीला डॉक्‍टरांनी मदत केली नाही, याचे खूप वाईट वाटले. तो आमचा नातेवाईक नव्हता, हा त्याचा दोष कसा? मृताचे बंधू पोचले, तेव्हा आम्ही वाचवू शकलो नाही, हे सांगताना आमचे डोळे भरून आले.
- योगेश पवार, क्रीडाशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death in Baramati due to doctors refusing treatment