Property-Card
Property-Card

म्हाळुंगे-माण टीपी स्कीम योजनेतील खातेदारांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सुमारे अडीचशे हेक्‍टरवरील म्हाळुंगे-माण टीपी स्कीम योजनेतील खातेदारांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रॉपर्टी कार्ड तयार झाली असून, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात वाटप करण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पीएमआरडीए’ने म्हाळुंगे माण हाय टेक सिटी प्रारूप नगर योजनेस सप्टेंबर २०१८मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर या योजनेवर नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या. दाखल हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य सरकारकडून लवादाची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तत्कालीन विशेष अधिकारी धनंजय खोत यांनी संबंधित जमिनीच्या मालकांची संवाद साधून ही योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सादर केली होती. राज्य सरकारकडून या योजनेला १२ डिसेंबर २०१९ रोजी अंतिम मान्यता दिली. त्यामुळे ही योजना राबविण्यातील सर्व अडथळे दूर झाले होते. 

राज्य सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यामुळे आता पुढील टप्पा हा या योजनेतील खातेदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा येणार आहे. त्यासाठी या योजनेचे मंजूर नकाशे ‘पीएमआरडीए’कडून भूमी अभिलेख विभागाला मध्यंतरी पाठविण्यात आले. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून या योजनेतील सुमारे सहा हजार खातेदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्षात खातेदारांना या कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. 

प्रॉपर्टी कार्डमुळे योजनेत कुठे प्लॉट मंजूर झाला आहे, त्यांचे क्षेत्रफळ काय आहे, आजूबाजूचे जागा मालक कोण आहेत, यांची खात्रीशीर आणि कायदेशीर माहिती जागामालकांना मिळणार आहे.

काय आहे योजना

  • २५० हेक्‍टरवर टीपी स्कीम. 
  • भूसंपादन केलेल्या एकूण जागेच्या ५० टक्के विकसित जागा जमीन मालकांना मिळणार. 
  • सातबारा उतारा संपुष्टात येणार. 
  • प्रत्येक जमीनमालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार. 

टीपी स्कीममधील फायदे 

  • विकसित ५० टक्के भूखंडावर अडीच एफएसआय मिळणार 
  • शेतीविकास झोनचे रहिवास झोनमध्ये रूपांतर होणार. 
  • जमिनीचे टायटल क्‍लिअर होणार

म्हाळुंगे येथे आमची जागा आहे. त्या ठिकाणी ‘पीएमआरडीए’कडून टीपी स्कीम जाहीर करण्यात आली आहे. जागामालकांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्ड हा कायदेशीर पुरावा असल्याने त्याचा फायदाच होणार आहे.
- सुनील चंदेरे, रहिवासी

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com