'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

फिर्यादी महिला डॉक्‍टर आहेत. त्यांचे कोंढवा परिसरात क्‍लिनिक आहे. सोमवारी (ता.11) सकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला.

पुणे : पतीने तुमची आणि मुलाच्या हत्येची पाच लाख रुपयांना सुपारी दिली आहे. मात्र मी मुलांच्या हत्येची सुपारी घेत नाही. पण मुलाला वाचवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खुनाच्या धमकीने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी, बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरातील एका डॉक्‍टर महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 तासात तपास करून आरोपी राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मूळ. छत्तीसगड) याला अटक केली आहे.

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्‍टर आहेत. त्यांचे कोंढवा परिसरात क्‍लिनिक आहे. सोमवारी (ता.11) सकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. "मै..कुरेशी बात कर रहा हूँ. तुम्हारे पतीने तुम्हारी और तुम्हारे बच्चे की पाच लाख रुपये मे मर्डर करणे की सुपारी दी है. मै बच्चों की सुपारी नही लेता. तुम्हारे बच्चों को बचाना है तो 5 लाख रुपये दो, असे बोलून आरोपीने फिर्यादींच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे डॉक्‍टर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्‍लेषनाद्वारे तपास करत असताना, पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांना माहिती मिळाली होती की, खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. त्यानुसार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

कोरोना सेवकांच्या वेशात जाऊन केली अटक :
पाटील हा सय्यदनगर येथील सेंट्रिंगच्या कामावर असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कोरोना सेवकाच्या वेशात बांधकाम साइटवर पोचले. त्यानंतर तेथील सर्व कामगारांना विश्वासात घेत आपण कोरोना संबंधित सर्व्हे करण्यासाठी आलो असल्याचे सांगत सर्वांचे मोबाईल क्रमांक घेऊन तपासणी केली. त्यावेळी राकेशच्या नंबरवरूनच डॉक्‍टर महिलेचा फोन आल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादींचा क्रमांक देखील मिळाला.

फिर्यादी महिलेच्या पतीच्या सांगण्यावरून आरोपीने खंडणीबाबत फोन केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आलेले नाही. त्यामुळे आरोपीने हा सर्व प्रकार नक्की कोणाच्या सांगण्यावरून केला याचा तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
- दुर्योधन पवार, पोलिस निरीक्षक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused demanded a ransom of Rs 5 lakh for save the child life