दरोड्यापाठोपाठ खुनाच्या घटनेला फुटली वाचा; आरोपींनी केला होता मित्राचा खून

Crime_Murder
Crime_Murder

पुणे : वैयक्तिक कामासाठी उसने दिलेले पैसे परत मागितले, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून इतर मित्रांनी उसने पैसे देणाऱ्या आपल्या मित्राला वरंधा घाटात फिरायला नेले. तिथेच त्यास दारू पाजून त्याच्यावर कोयत्याने वार करीत त्याचा मृतदेह घाटातील 600 फूट खोल दरीत फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी स्वतःला दरोड्याच्या गुन्ह्यात गुंतवून घेतले. ते एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली. पथकाने त्यांना सापळा रचून पकडले आणि दरोड्यापाठोपाठ खुनाच्या घटनेलाही वाचा फुटली! 

दीपक बापू वाडकर (वय 21, रा.बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी पोलिसांनी गणेश चव्हाण (वय 23 ), विशाल जाधव (वय 32), सुनील वसवे (वय 23, तिघेही रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. दशरथ शिंदे आणि त्यांचा एक साथीदार पोलिसांच्या कारवाई दरम्यान पळून गेला. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत जाधव, पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या पथकास बुधवारी रात्री काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने सापळा रचून गणेश चव्हाण, विशाल जाधव, सुनील वसवे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू होती. त्यावेळी संबंधित आरोपींनी त्यांच्या एका मित्राचा खून केल्याचे पोलिसांना समजले. आरोपींना पोलिसी खाक्‍या दाखविताच, त्यांनी खुनाच्या घटनेची माहिती दिली. 

दीपक वाडकर आणि आरोपी एकाच परिसरात राहात होते. त्यातून त्यांची ओळख झाली होती. दरम्यान वाडकर याने संबंधित आरोपींना वेळोवेळी उसने पैसे दिले होते. वाडकर ते पैसे परत देण्याची मागणी करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे आरोपींनी वाडकरला वरंधा घाटामध्ये फिरायला नेले. तेथे त्याला दारु पाजून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर मृतदेह घाटातील दरीत फेकून दिल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी बिबवेवाडी पोलिस ठाणे गाठून वाडकर केव्हा बेपत्ता झाला, याची तपासणी केली. तेव्हा वाडकर 18 मार्च 2019 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात मिळाली. त्यानंतर मृतदेहाचा शोध घेण्यास सुरवात केली.

मृतदेहाच्या शोधासाठी गिर्यारोहकांनी केली मदत 
खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वाडकरच्या मृतदेहाचा शोध घेणे पोलिसांच्यादृष्टीने महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी ससूनचे वैद्यकीय पथक आणि द अल्पायनीस्ट या गिर्यारोहक संस्थेचे भगवान चवळे, अक्षय भोकरे, सुनील बलकवडे, अक्षय शेलार, सुमीत गावडे या गिर्यारोहकांना घेऊन वरंधा घाट गाठला. तेथे शोधकार्य सुरू केल्यानंतर 600 फूट खोल दरीमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी जप्त केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com