नयना पुजारी प्रकरणातील आरोपींना आज शिक्षा होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मदतीचा हात...क्षणोक्षणी...प्रत्येक ठिकाणी

'कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी' मस्केटिअर ऍप्लिकेशन हे 'रिअल टाइम हेल्प ऍप' आहे. 
'मस्केटिअर' ऍपवरील बटन क्लिक करा...
अन्‌ काही क्षणांतच आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरील विश्‍वासू व्यक्‍ती किंवा पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील. 
त्यासाठी मोबाईलमध्ये मस्केटियर अॅप डाऊनलोड करा. 

Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.musketeer

App Store
https://itunes.apple.com/app/id692063224?mt=8⁠⁠⁠⁠

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी दोषी ठरविले आहे. आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर उद्या (मंगळवारी) मिळणार आहे. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराला दोषमुक्त ठरविले गेले आहे.

योगेश अशोक राऊत (वय २४, रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी. रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी दोषी धरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानातील अपहरण (कलम ३६६), सामूहिक बलात्कार (कलम ३७६ जी), खून (कलम ३०२), मयत व्यक्तीच्या वस्तूंचा अपहार करणे (कलम ४०४), कट रचणे (कलम १२० ब) आणि पुरावा नष्ट करणे (२०१) आदी कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी पुरावा नष्ट करण्याचे कलम वगळता इतर कलमांखाली न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. सकाळी साडेअकरा वाजता खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. प्रत्यक्षात आरोपींना न्यायालयात हजर करण्यास पाऊण तास उशीर झाला, त्याचप्रमाणे माफीच्या साक्षीदारालाही एक तासाहून अधिक वेळाने न्यायालयात हजर केले गेले. याबाबत न्यायाधीश येनकर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा येरवडा कारागृहातूनच आरोपींचा ताबा उशिरा मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने याबाबत येरवडा कारागृह अधीक्षकांना नोटीस जारी केली आहे.

न्यायाधीशांनी तीनही आरोपींना कोणत्या कलमाखाली दोषी ठरविले याची माहिती दिली. सुनावणीच्या वेळी आरोपींच्या चेहऱ्यावर दडपण दिसत होते.

फाशी की जन्मठेप? 
खटल्याच्या सुनावणीतील प्रक्रियेनुसार शिक्षेवर सरकार पक्ष आणि आरोपीच्या पक्षाला बाजू मांडावी लागणार आहे. न्यायाधीश येनकर यांनी पुढील सुनावणी उद्या ठेवली आहे. आरोपींना फाशी होणार की जन्मठेप, याचे उत्तर उद्याच मिळेल. या खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी ३७ जणांची साक्ष नोंदविली आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी, त्याच्या साक्षीला पूरक वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावा आदी मुद्दे आरोपींना दोषी ठरविण्यात महत्त्वाचे ठरले. फाशीच्या शिक्षेची मागणी करताना हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे का? हे सरकार पक्षाला न्यायालयास पटवून द्यावे लागेल. याबाबत निंबाळकर म्हणाले, ‘‘हा गुन्हा ‘निर्भया प्रकरणा’पेक्षा अधिक अमानुष आणि गंभीर आहे. आरोपींनी नयना पुजारी यांचे अतोनात हाल केले. आरोपींनी पुजारी यांचे कपडे काढले होते, तीन वेळा त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि गळा आवळून खून केला, त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांचा चेहरा दगडाने ठेचून त्यांना निर्जनस्थळी फेकून दिले. त्यामुळे फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल. ती झाल्यास अशाप्रकारचे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही. न्यायालयाकडे आरोपींना फाशीची देण्याची मागणी करणार आहे.’’
  
खटल्याच्या सुनावणीस विलंब
ऑक्‍टोबर २००९ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आणि त्यांच्याविरुद्ध मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना यश आले होते; परंतु खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी राऊत हा ससून रुग्णालयातून पळाला होता. तो सुमारे पावणेदोन वर्षानंतर पोलिसांना सापडला. यामुळे खटल्याच्या सुनावणीस उशीर झाला. राऊत पळून जाण्यापूर्वी सहा जणांची साक्ष झाली होती. तो परत सापडल्यानंतर त्यापैकी काही साक्षीदारांची फेरसाक्ष नोंदवावी लागली. याच काळात सुरवातीला माफीचा साक्षीदार झालेला चौधरी याने त्याला माफीचा साक्षीदार करू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. राऊत सापडल्यानंतर तो पुन्हा माफीचा साक्षीदार झाला होता. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश मदन जोशी, त्यानंतर अनंत बदर, साधना शिंदे या न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. प्रत्येक न्यायाधीशांसमोर खटल्याचे कामकाज चालले; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर खटल्याची सुनावणी पुढील न्यायाधीशांसमोर झाली. विशेष न्यायाधीश येनकर यांच्यासमोर नियमित सुनावणी होऊन अंतिम सुनावणी पार पडली.

कॅब चालकाचे निर्घृण कृत्य

संगणक अभियंता नयना पुजारी ही ८ ऑगस्ट २००९ रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपासला झेन्सॉर कंपनीजवळ उभी होती.

कॅबचालक योगेश अशोक राऊत (वय २९, रा. घोलेगाव, ता. खेड) हा तेथून जात होता. त्याने नयना पुजारीला सोडण्याच्या बहाण्याने कॅबमध्ये बसवून रात्री निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ओढणीने गळा आवळून दगडाने ठेचून तिचा खून केला. तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता.

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी योगेश अशोक राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (२३, दोघेही रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (२४, रा. सोळू, खेड) आणि विश्‍वास हिंदूराव कदम (२६, रा. मरकळ, ता. खेड, मूळ रा. खटाव, जि. सातारा) या चार आरोपींना १६ ऑक्‍टोबर २००९ रोजी अटक केली. 

राऊत ‘ससून’मधून फरारी
मुख्य आरोपी योगेश राऊतला १७ सप्टेंबर २०११ रोजी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून तो लघुशंकेच्या बहाण्याने पसार झाला.  त्यानंतर योगेश राऊत रेल्वेने सुरतला गेला. तेथून दिल्ली गाठली. तेथे काम न मिळाल्याने तो अमृतसरला गेला. तेथील एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. पोलिसांनी त्याला शिर्डीच्या बस स्थानकातून अटक केली. 

घटनाक्रम 
७ ऑक्‍टोबर २००९ -  नयना पुजारी यांचे अपहरण, बलात्कार, खून
८ ऑक्‍टोबर २००९ - राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे पुजारी यांचा मृतदेह आढळला, खेड पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद 
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर येरवडा पोलिसात गुन्हा वर्ग
१६ ऑक्‍टोबर २००९ - तीन आरोपींना अटक
जानेवारी २०१० - चार आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल 
जुलै २०१० - माफीचा साक्षीदार राजेश चौधरीचा ‘इन कॅमेरा’ जबाब
नोव्हेंबर २०१० - राजेश चौधरी याचा जबाब न्यायालयात उघड
फेब्रुवारी २०११ - तीन आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चित 
१७ सप्टेंबर २०११ - ससून रुग्णालयातून आरोपी राऊत पळाला
३१ मे २०१३ - शिर्डी येथे आरोपी राऊत याला अटक

मदतीचा हात...क्षणोक्षणी...प्रत्येक ठिकाणी

'कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी' मस्केटिअर ऍप्लिकेशन हे 'रिअल टाइम हेल्प ऍप' आहे. 
'मस्केटिअर' ऍपवरील बटन क्लिक करा...
अन्‌ काही क्षणांतच आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरील विश्‍वासू व्यक्‍ती किंवा पोलिस तुमच्या मदतीला धावून येतील. 
त्यासाठी मोबाईलमध्ये मस्केटियर अॅप डाऊनलोड करा. 

Google Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.musketeer

App Store
https://itunes.apple.com/app/id692063224?mt=8⁠⁠⁠⁠

Web Title: accused punishment today in nayana pujari rape case