esakal | कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज मिळताच, पोलिस कोठडीत रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Police-Custody

कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज मिळताच, पोलिस कोठडीत रवानगी

sakal_logo
By
सनिल गाडेकर

पुणे : खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह माणगाव रस्त्यावरील प्लस व्हॅलीच्या दरीत फेकून दिल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोरोनातून बरा झाल्यानंतर आरोपीची थेट पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सागर संभाजी खोपडे (वय २९) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला पौड पोलिसांनी अटक केली आहे. खोपडे याला अटक केल्यानंतर त्याला कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. त्याच त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. या याप्रकरणी यापूर्वी नंदकिशोर बाबासाहेब नागरपनवर याला अटक अटक करण्यात आली होती. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर मार्केटयार्डातील गर्दीवर मिळवले नियंत्रण

दीपक चंद्रकांत चव्हाण (वय ३३) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पौड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मृगदिप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. ४ एप्रिल रोजी पुणे-माणगाव रोडवरील प्लस व्हॅलीच्या परिसरात ही घटना घडली होती. दीपक आणि सागर यांच्यात वाद झाला होता. त्यातून आरोपीने दीपक यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याचा मृतदेह प्लस व्हॅलीच्या दरीत फेकून देण्यात आला. तसेच त्यांचा मोबाईलही फोडून झाडीत फेकून दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी नक्की कोणत्या कारणासाठी खून केला? त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत आरोपीला पोलिस कोठडी सुनावली.