esakal | अखेर मार्केटयार्डातील गर्दीवर मिळवले नियंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर मार्केटयार्डातील गर्दीवर मिळवले नियंत्रण

अखेर मार्केटयार्डातील गर्दीवर मिळवले नियंत्रण

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे : गुळ-भुसार, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि फुल बाजारात सोमवारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी ५० ते ६० टक्के गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. बाजार समिती व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे प्रभावी नियोजन केले होते. पास आसेल, तरच बाजारात प्रवेश दिला जात आहे. अनावश्यक वाहनांना बाजारात प्रवेश नाकारण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे बाजारातील गर्दीत लक्षणीय घट झाली आहे.

बाजारात माल घेऊन येणार्‍या वाहनांना एक गेटमधून आत, तर दुसर्‍या गेटमधून बाहेर पडण्याचे नियोजन करण्यात आल्याने कोणत्याच विभागात वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले नाही. गर्दी होणार नाही, यासाठी पोलिस कर्मचारी बाजारात कार्यरत आहेत. त्यात पास असेल, तरच बाजारात प्रवेश, किरकोळ खरेदी बंद, डमी विक्रेत्यांवर बंदी, रिक्षाला बंदी, बाजारात येणारे बहुतांश रस्त्यांवर बॅरिगेटस् लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उपाय योजनांमुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास बाजार समिती प्रशासनाला यश आले आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड बंद होणार सांगून, आजोबांची पावणे दोन लाखांची फसवणूक

बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या समवेत पोलिस अधिकार्‍यांनी मागील चार दिवसांपूर्वी बाजाराची पाहणी केली होती. त्यानंतर झालेल्या पैठकीत मार्केटयार्डातील गर्दी कमी करण्यासाठी उपाय-योजना करण्यात आल्या होत्या. भाजीपाला विभागात मात्र विक्रमी आवक झाली. त्यामुळे सुमारे 20 ते 25 टक्के माल गाळ्यावर शिल्लक राहिला. भुळ-भुसार विभागातही धान्याचा साठा आहे. बाजार सुरूच राहणार असल्यामुळे खरेदीदारांनी एकाच वेळी गर्दी करू नये. असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भुसार बाजारातही दिवसभर गर्दी कमी

गुळ भुसार बाजारात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच सकाळपासूनच विभाग प्रमुख नितीन रासकर आणि सुरक्षा रक्षक यांनी प्रयत्न केल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

हेही वाचा: लोकांसाठी रेमडेसिव्हीरचे इंजेक्शनची व्यवस्था करा : चंद्रकांत पाटील

बाजारात अन्नधान्य आणि भाजीपाला मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. याचा तुटवडा नाही. त्यामुळे भाव ही आवाक्यात आहेत. बाजार समिती व पोलिस प्रशासनाने मार्केटयार्डातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे सोमवारी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. कोरोना संकटामुळे येत्या काळातही बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरूच असणार आहेत. शेतकरी, आडते आणि खरेदीदारांनी कोरोनाचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

भुसार फळे -भाजीपाला आवक

सोमवारी बाजारात विविध प्रकारच्या १६०२ वाहनातून ३८२२७.९४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. तर भुसार बाजारात विविध प्रकारच्या २७४ वाहनातून ३५२५७ क्विंटल धान्याची आवक झाली. सोमवारी मार्केट यार्डात दररोजच्या तुलनेत भाजीपाला, कांदा - बटाटाची आणि फळांची आवक मागील एका वर्षातील सर्वात जास्त झाली आहे.