पुणे : क्षणार्धात ओळखा भेसळ! पुण्यातील संशोधकांचे यश

पुणे : क्षणार्धात ओळखा भेसळ! पुण्यातील संशोधकांचे यश

पुणे - तुम्ही खात असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ आता सहज शोधता येणार आहे. याचबरोबर चकाकी आणण्यासाठी फळांना लावलेले रसायन, कृत्रिम रंग लावलेल्या पालेभाज्याही अवघ्या काही सेकंदांत ओळखणे शक्‍य होईल. याबाबतचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झाले आहे. त्याची दखल अमेरिकेतील ‘जर्नल ऑफ रामन स्पेक्‍ट्रोस्कोपी’ या संशोधनपत्रिकेने घेतली आहे. 

डॉ. श्रीकृष्ण सरताळे आणि संशोधक विद्यार्थी इमरान शेख यांचे हे संशोधन आहे. प्रत्येक खाद्यपदार्थ सुरक्षित असण्याचा आग्रह धरला जात आहे. त्याच वेळी रंग लावलेल्या भाज्या, रसायने लावलेली फळे किंवा युरिया टाकलेले दूध अशा भेसळीचा शोध घेणे हे प्रयोगशाळांपुढील डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. याविषयी शेख म्हणाले, ‘‘भेसळ ओळखण्यासाठी रामन विकिरण तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे आम्हाला जाणवले. यासाठी ‘सरफेस एनहान्स रामन स्पेक्‍ट्रोस्कोपी’ प्रणालीचा वापर करीत भेसळीतील मिथिलीन ब्ल्यू, कोंगो रेड, मेलॅमाईन, विविध रंग यांसारख्या विषारी घटक शोधता आले.’’ फळे, पालेभाज्यांवर केलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक घटक आढळतात. ते या संशोधनातून शोधणे शक्‍य होईल.

संशोधनाचा प्रभावी वापर आणि ते अधिक स्वस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील भेसळ शोधण्यासाठी सामान्य लोकांना परवडेल, असे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- प्रा. डॉ. श्रीकृष्ण सरताळे, भौतिकशास्त्र विभाग 

असे झाले संशोधन 
रामन विकिरण पद्धतीत ‘सरफेस एनहान्स रामन स्पेक्‍ट्रोस्कोपी’(सर्स) प्रणालीचा वापर करण्यात आला. काचेच्या पट्टीवर धातूच्या नॅनो पार्टिकल्सची वाढ केली जाते. त्यावर भेसळयुक्त अन्न पदार्थाचा नमुना ठेवला जातो. ही पट्टी रामन स्पेक्‍ट्रोस्कोपखाली ठेवून त्यावर लेझर किरणे सोडली जातात. त्यातून अन्न पदार्थातील भेसळयुक्त पदार्थाचे अस्तित्व स्पष्ट दिसून येते. ती नेमकी कोणत्या रासायनिक घटकांची भेसळ आहे, त्याचे प्रमाण किती आहे, त्याची भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचे विश्‍लेषण यातून मिळते. त्या आधारावर भेसळीचा अचूक निष्कर्ष काढला येतो. 

रामन विकिरण पद्धत म्हणजे काय?
कोणत्याही पदार्थावर टाकलेले लेझर किरण त्यात असलेल्या प्रत्येक मूलद्रव्यासाठी विशिष्ट परावर्तन गुणधर्म दाखवतात. नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर रामन यांचा हा शोध ‘रामन परिणाम’ म्हणून ओळखला जातो. पदार्थातून परावर्तित होणाऱ्या लेझर किरणांच्या अभ्यासातून त्यातील सर्व मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा इत्थंभूत माहिती मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com