मनाचिये वारी : वारीचा प्रवास अंतरंगातून करूया

dastapurkar.jpg
dastapurkar.jpg

Wari 2020 : अनादी कालापासून पंढरीच्या वारीची परंपरा आहे. परंतु, संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी सव्वासातशे वर्षांपासून बहुजनांना सोबत घेऊन वारीची वाट पारमार्थिक अर्थाने अधिक विस्तीर्ण केली. पांडुरंगाशी एकरूप होणे हेच वारकऱ्याचे अंतिम ध्येय आहे, याची शिकवण या संत मांदियाळीने दिली. साधक, साधना आणि साध्य ही त्रिपुटी वारीत घडते. वारकरी हा साधक असतो, साधना वारी असते, तर साध्य पंढरीचा पांडुरंग. वारीत कायिक, वाचिक आणि मानसिक उपासना घडतात. त्यामुळेच वारकऱ्यांची सर्वांत महत्त्वाची साधना पंढरीची आषाढी वारी समजली जाते.

यंदा वैश्‍विक महामारीमुळे जग हैराण झाले आहे. जगभरातील सर्व मोठमोठे सण, उत्सव, यात्रा रद्द कराव्या लागल्या आहेत. मानवी जीवनाला कोणताही धोका होऊ नये, यासाठी सरकार काळजी घेत आहे. त्यामुळे यंदाची पायी वारी रद्द करण्याचा सरकारने निर्णय घेतला. तसे पाहिले तर वारी खंडित झाली, असे म्हणता येणार नाही, तर त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे, असे म्हणणे अधिक सोईस्कर होईल. कोरोनामुळे वारकऱ्यांना कायेने यंदा बाधा येत असेल; पण मनाला कोणी अडवू शकत नाही. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा यंदा आपण वारकऱ्यांनी मनोमय वारी करूया. घरात बसून ग्रंथवारी करूया. बहिर्रंग प्रवास करण्यापेक्षा यंदा अंतरंगातून वारीत आध्यात्मिक प्रवास करूया. वारीत मिळणारा संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा सहवास ज्ञानेश्‍वरी वाचनातूनही लाभू शकतो. नव्या पिढीने या काळात ग्रंथांचे पारायण करावे. संतविचारांची नाळ जोडावी. महामारीमुळे आपल्याला प्रतिबंध आला असेल; पण देवाला आपल्याकडे येण्यासाठी प्रतिबंध नाही.

वारीचे खरे स्वरूप जीव-शिव ऐक्‍य हेच आहे. त्यासाठी पंढरपूरलाच जायला पाहिजे, असा अट्टहास यंदा करणे टाळावे. कूर्मदास महाराजांना शरीराने साथ दिली नाही. तेव्हा आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाने त्यांना दर्शन देऊन त्यांचा उद्धार केला. हेच वारीचे खरे स्वरूप आहे. वारीच्या नियमात खंड होतो, म्हणून खंत वाटते. पण महामारीत वारी करून संसर्ग वाढविण्यात कारणीभूत ठरलो, तर ती वारी कशी साध्य होईल? त्यामुळे वारकऱ्यांनी यंदा घरात बसून मनोमय वारी करावी.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)
 

""तरडगाव येथील चांदोबा लिंबाजवळ माउलींच्या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होते. कोरोनामुळे येथील आनंद सोहळ्याला तरडगावकर मुकले आहेत. दरवर्षी गावात माउलींच्या आगमनाने येणाऱ्या चैतन्याला पारखे झालो आहोत.''
- सुभाष महाराज मगर, तरडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com