शाळांमध्ये हवा अभिनयाचाही तास - जयंत सावरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - ‘शाळेत चित्रकला, संगीत, खेळ यांचा वेगळा तास असतो; पण अभिनयाचा नसतो. मुलांमधील सुप्त कलागुण फुलविण्यासाठी, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी शाळांनी अभिनयाचा तास जरूर घ्यायला हवा,’’ अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, रंगकर्मी जयंत सावरकर यांनी सोमवारी व्यक्त केली. अभिनयाचा तास हा मुद्दा संमेलनातील अध्यक्षीय भाषणातसुद्धा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चंद्र-सूर्य रंगभूमी आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग संघाच्या ‘जनावर’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शिवाजी मराठा हायस्कूल (भास की आभास) आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स स्कूल (शोध स्वतःचा) या संघाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना सावरकर यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. ॲड. एन. डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र सूर्य, परीक्षक रफीक मत्तीकोप, इरा देशपांडे, पुष्कर केळकर उपस्थित होते.

सावरकर म्हणाले, ‘‘आपण नाटक पाहतो त्या वेळी फक्त अभिनय पाहत असतो; पण त्या कलावंताची अभिनयामागची नेमकी तयारी, त्याची शब्दफेक, देहबोली यातून तयार झालेले त्याचे व्यक्तिमत्त्व पाहत नाही किंवा अभ्यासत नाही. स्पष्ट बोलता येणे, आपल्या बोलण्यातील आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. हे संस्कार लहान वयापासून मुलांना द्यायला हवेत. बोलताना ‘श’ आणि ‘ष’चा उच्चार करता यायला हवा. हे सगळे अभिनयाच्या तास घेतले तर लहानपणापासूनच जमू शकेल.’’ प्रदीप पाटसकर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद सूर्य यांनी आभार मानले.

१९५९ पासून बालरंगभूमीशी माझा संबंध आहे. ‘कळ लाव्या कांद्याची कहाणी’ या रत्नाकर मतकरींच्या नाटकापासून. आम्ही मोठी माणसेच लहानांसाठी नाटक करायचो. त्यालाच बालरंगभूमी म्हटले जायचे. आता मुले स्वतः रंगमंचावर येऊन नाटक सादर करत आहेत. पालक-शिक्षक त्यांना समजून घेऊन प्रोत्साहन देत आहेत, ही चांगली बाब आहे. कारण मुलांना समजून घेणे सोपे नसते.
- जयंत सावरकर, नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष

Web Title: acting class in school