कॉंग्रेसच्या या नगरसेवकाची येरवडा कारागृहात रवानगी 

विजय जाधव
Saturday, 8 August 2020

सादिक फरास व कदीर शेख यांनी १६ जुलै रोजी नगरपालिकेतील रचना सहायक पवन भागणे यांना कामकाजाच्या वेळेत शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.

भोर (पुणे) : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरपालिकेतील कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सादिक हसन फरास आणि त्यांचा सहकारी शाहिद कदीर शेख यांची शुक्रवारी (ता. ७) कारागृहात रवानगी करण्यात आली. भोर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी याबाबतचे आदेश दिले. अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू मोरे व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली. 

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

सादिक फरास व कदीर शेख यांनी १६ जुलै रोजी नगरपालिकेतील रचना सहायक पवन भागणे यांना कामकाजाच्या वेळेत शिवीगाळ करून दमदाटी व धक्काबुक्की केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. पवन भागणे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फरास व शेक यांच्यावर १७ जुलैला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तर तोही न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे दोघे शुक्रवारी (ता. ७) सकाळी  पु्ण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात शरण गेले. न्यायालयाने त्यांना भोरच्या न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले. 

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फरास व शेख यांना शुक्रवारी सायंकाळी भोर न्यायालयाने हजर करून पोलिसांकडून अहवाल मागविला आणि दोघांची रवानगी येरवडा कारागृहात केली. याबाबत पोलिस निरीक्षक राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against Congress corporator in Bhor for beating up a municipal employee