आळंदी पालिकेला अखेर जाग, कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणांवर हातोडा! 

विलास काटे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

 कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पालिकेने आज सुमारे पंधराहून अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. मात्र,

आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पालिकेने आज सुमारे पंधराहून अधिक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. मात्र, प्रदक्षिणा रस्ता, चाकण रस्ता व मरकळ रस्त्यावर अनधिकृत शेंडबांधकाम अद्याप कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

आळंदी शहरात गेल्या अडीच वर्षांपासून अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रमुख रस्त्यांच्या कडेला पदपथावर व पालिकेच्या मोकळ्या जागेत अनाधिकृत बांधकामे झाली. अनेकांनी हातगाड्या व पथारी मांडून टपऱ्या लावल्या. त्यामुळे शहरात बकालपणा वाढला. त्यातून वाहतूक कोंडीही होऊ लागली होती.

याबाबत नेहमीच प्रशासनाकडे बोट दाखविले जात असे. प्रशासनाबरोबर राजकीय मंडळीही अनधिकृत बांधकामास जबाबदार होती. मात्र, आठवड्यावर येऊन ठेपलेल्या कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. यामध्ये अनेक वर्षांपासूनचे पालिकेच्या समोरचे हॉटेल, मरकळ रस्त्यावरील पाण्याच्या टाकीखालील शेडबांधकाम, देहू फाट्यावरील शेडबांधकाम जमीनदोस्त केले. एसटी स्थानकाशेजारील टपऱ्या हटविल्या. अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांच्यावतीने बंदोबस्त देण्यात आला होता. उद्या आणखी कारवाई केली जाणार आहे. 

दरम्यान, अद्यापही प्रदक्षिणा रस्त्यावर अनेकांनी बांधकामे करताना इमारतीच्या बाजूने मोकळ्या जागा न सोडताच बांधकाम केली आहेत. मरकळ रस्ता, चाकण रस्ता या ठिकाणीही पदपथाला लागूनच अनधिकृत शेडबांधकाम केले. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रसाद विक्रेत्यांनी तर चक्क रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. त्यांनी स्वतः अतिक्रमणात राहून पेढे विक्रेत्यांनाही पोटभाडेकरूप्रमाणे जागा भाड्याने दिल्या. तरीही पालिकेने त्यावर अद्याप कारवाई केली नाही. पालिकेने नोटीस देऊनही पुढे कारवाई न केल्याने अनधिकृत बांधकामधारक बिनधास्त आहेत. 

तोंड पाहून कारवाई 
अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण कारवाई करताना सरसकट कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या तोंड पाहून कारवाई केली जात आहे. कार्तिकी वारीत पालिका तात्पुरत्या स्वरूपात जागा भाड्याने देते. यामध्ये काहींनी पावती करून जागा घेतल्याचे दाखविले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही. अतिक्रमणापासून वाचण्यासाठी काहींनी अशीही पळवाट काढली आहे. एकदा पावती झाली की वर्षभर दुकाने थाटण्यास मोकळा, असेच चित्र आळंदी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against illegal construction of Alandi city