'हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. जेणेकरून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल. काही विकासकामे प्रलंबित असल्यास तत्काळ पाठपुरावा करावा. मात्र, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. 

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक गुरुवारी विधानभवन सभागृहात आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. खासदार अमर साबळे व अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके आदी या वेळी उपस्थित होते. 

बैठकीत दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करून अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, अशी सूचना साबळे यांनी केली. तर, विविध विभागप्रमुख व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्‍यक आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन शिरोळे यांनी केले. 

जिल्ह्यात एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व केंद्र पुरस्कृत योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Web Title: Action on the defaulting officers