Crime News : भंगार विक्रेत्याला लुबाडणाऱ्या टोळीवर मोकांतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action under Mokka against gang robbing scrap dealer ritesh kumar police pune

Crime News : भंगार विक्रेत्याला लुबाडणाऱ्या टोळीवर मोकांतर्गत कारवाई

पुणे : लोणीकंद- केसनंद रस्त्यावर भंगार विक्रेत्याला मारहाण करून लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेश जारी केले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत २६ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

तानाजी अर्जुन जाधव (वय २२, रा. लाडबा वस्ती, केसनंद, नगर रस्ता), रोहित राजू माने (वय २१, रा. गुजरवाडी, निंबाळकर वस्ती, कात्रज), ओंकार नरहरी आळंदे (वय २१, रा. वडगाव रस्ता, बालाजी वस्ती, केसनंद, नगर रस्ता) अशी मोकांतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. तानाजी जाधव हा टोळीप्रमुख असून, त्याने दोन साथीदारांच्या मदतीने शस्त्राच्या धाकाने लूटमार, गंभीर दुखापत करणे, मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याचे गुन्हे केले आहेत.

या तिघा आरोपींनी लोणीकंद-केसनंद रस्त्यावर एका भंगार विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटली होती. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात जाधव आणि साथीदारांविरुद्ध मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मारुती पाटील, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, प्रशांत कातुरे, सागर कडू यांनी तयार केला. हा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी करुन मोका कारवाईस मान्यता देण्यात आली.

टॅग्स :Pune NewsActionScrap