
सासवड : कोरोना संसर्ग वाढीची अनेक कारणे आहेत. पैकी विवाह समारंभ व घरगुती धार्मिक कार्यक्रम ही सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पोलिस पोचून कारवाई करतीलच. परंतु, जवळपासच्या नागरीकांनी समाजहितासाठी जागृत व्हावे व 50 पेक्षा अधिक लोक एकत्र दिसतील, ते ठिकाण कळवावे आणि नाव गुप्त राखत पोलिसांचे योग्य बक्षिस मिळवावे, असे जाहीर आवाहन जिल्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी सासवड येथे 'सकाळ'शी बोलताना केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मोहिते वार्षिक तपासणीनिमित्त सासवड पोलिस ठाण्यात आले होते. त्यानिमित्त बोलताना म्हणाले, कुठल्याही विवाह समारंभात बंधने सोडून नियम तोडून गर्दी केली जात आहे. त्यामुळे दोनशेची मर्यादा.. आता बंदिस्त मंगल कार्यालयात वधू व वराकडील मिळून 50 वर आणि खुल्या जागेत दोन्हीकडील मिळून 100 वर आणली आहे. त्यापेक्षा एक जरी नागरीक जास्त असेल तर वधू व वर पिता, मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक याच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश बजावले आहेत.
प्रत्येक विवाहाचे फोटो, व्हिडीओ शुटींग, केटरींगची आॅर्डर तपासून नंतरही शंका वाटली तरी खटला दाखल करता येणार आहे. कार्यालयाच्या पहील्या कारवाईनंतर पुन्हा कारवाईची वेळ आली तर वर-वधू पित्यांवर खटला व मंगल कार्यालयाच्या मालकावरच गुन्हा दाखल करुन कार्यालयास टाळे ठोकण्याची पोलिस यंत्रणेस परवानगी देण्यात आली आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी विवाह समारंभातील गर्दी रोखण्यावर हयगय करु नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल, असेही मोहिते बजावण्यास विसरले नाहीत. यावेळी भोर पोलिस उप विभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, राहुल घुगे, महिला पोलिस उप निरीक्षक सुप्रिया दुरांदे आदी उपस्थित होते.
सासवड व परीसर पुणे शहरापासून जवळ आहे. त्यामुळे शहरी भागात जा-ये करणारे अनेक लोक आहेत. त्यातून पुण्याइतकाच किंवा त्याहून अधिक कोरोना संसर्गाचा वेग येथे आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस जिल्हाधिकारी यांचे नवे नियम, बंधने याची जाणीव करुन देत आहेत. ही पोलिस कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्याचे आदेश दिलेत. कोणीही कसलीही सबब न सांगता.. होणाऱया कारवाईस सामोरे जावे, असे सांगून मोहिते म्हणाले, ''पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक आदी साऱया वरीष्ठांनी समाजहितासाठी पुणे जिल्ह्यातच खंबीर पावले उचलण्याचे बजावले आहे. आवश्यक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची पोलिसांनी मदत घ्यावी."
जत्रा, यात्रा व हाॅटेल व्यावसायिकांवर करडी नजर-गावोगावी यात्रा-जत्रा हंगाम सुरु होत असला तरी हा सारा प्रकार महामारीमुळे रद्द आहे. कोणी चोरुन जरी यात्रा-जत्रा केली, गर्दी केली.. तरी पोलिसांची नजर त्यावर राहील. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापर यावर लक्ष देताना कारवाईची तीव्रता वाढवा., असे आदेश दिल्याचेही मिलींद मोहिते यांनी सांगितले हाॅटेल, ढाबे यांना कोरोनाचे सारे नियम पाळून क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांसाठी परवानगी दिली आहे. तिथे रोज पोलिस भेट व कार्यवाही अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना समोरासमोर बजावले.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.