बारामतीत कोरोनासाठी अॅक्टिव्ह सर्व्हे ; तीन गावांच्या सीमा करण्यात येणार सील

मिलिंद संगई
Friday, 11 September 2020


माळेगाव, पणदरे, गुनवडीत सोमवारी होणार ८१०० कुटुंबांची तपासणी 

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याच्या उद्देशाने काही गावात अॅक्टिव्ह सर्व्हे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. माळेगाव, पणदरे व गुनवडी या तीन गावात येत्या सोमवारी (ता. 11) ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

या मोहिमेसाठी तीनही गावांच्या सीमा सोमवारी सील करण्यात येणार आहेत. गावात कोणाला येता येणार नाही किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत कोणाला गावाच्या बाहेर जाता येणार नाही. या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी राबविणार मोहीम 
या मोहिमेत माळेगावमधील पाच हजार, पणदरे येथील 1700, तर गुनवडीतील 1400 कुटुंबांतील प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्कॅनर तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची लगेचच रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. या तीनही ठिकाणी सोमवारपुरते तात्पुरते कोविड केअर सेंटरही उभारले जाणार आहे. सकाळी सात ते बारा या वेळेत हा सर्व्हे होईल. त्यासाठी माळेगावसाठी 92, पणदरे गावासाठी 27, तर गुनवडीसाठी 25 पथके तयार केली आहेत. या पथकात दोन सरकारी कर्मचारी व एक स्वयंसेवक, असे तीन जण असतील. प्रत्येक पथकाकडे 50 कुटुंबांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती शहरात तपासणी सुरू 
बारामतीतही अशा तपासण्यांना प्रारंभ झाला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु झाली आहे. प्रभाग दहामध्ये नगरसेवक सूरज सातव, गणेश सोनवणे, संतोष जगताप यांच्यासह अमोल गोफणे, रियाज काझी आदींनी ऑक्सिजन लेव्हल व थर्मल तापमान घेण्यास प्रारंभ केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Active Survey for Corona in Baramati