पश्चिम घाटातील जैवविविधतेत ‘टार्डीग्रेड’ची भर | Tardigrade | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम घाटातील जैवविविधतेत ‘टार्डीग्रेड’ची भर
पश्चिम घाटातील जैवविविधतेत ‘टार्डीग्रेड’ची भर

पश्चिम घाटातील जैवविविधतेत ‘टार्डीग्रेड’ची भर

पुणे - अतिउच्च तापमानात, तसेच अतिथंड वातावरणात अनेक वर्ष सुप्त (फ्रिज) अवस्थेत जिवंत राहणाऱ्या गोड्या पाण्यातील ‘टार्डीग्रेड’ या सूक्ष्मजीवाचा शोध लावण्यात आणि त्यावरील मूलभूत अभ्यास करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाला यश मिळाले आहे. भविष्यात या ‘टार्डीग्रेड’चा उपयोग अंतराळातील संशोधनात होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील संशोधक कल्याणी भाकरे आणि प्राध्यापक डॉ. कल्पना पै यांनी ‘अक्वाटिक इकॉलॉजी’ या रिसर्च जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. कल्पना पै म्हणाल्या, ‘टार्डीग्रेडला ‘वॉटर बेअर’ या नावानेही संबोधले जाते. ‘टार्डीग्रेड’ची भारतात सर्वांत आधी नोंद ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली होती. तेव्हापासून यावर दीर्घकालीन अभ्यास झाला नव्हता. या आधीही जमिनीवर टार्डीग्रेड आढळले होते. मात्र, गोड्या पाण्यातील ‘टार्डीग्रेड’ हे या अभ्यासादरम्यान आढळून आले.’

कल्याणी भाकरे म्हणाल्या, ‘पश्चिम घाटात विविध जलचर परिसंस्था आहेत. या परिसंस्था वैविध्यपूर्ण सूक्ष्मजीवांसह इतर अनेक जलचरांचा अधिवास आहेत. पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेली तात्पुरत्या निवासस्थानांमध्ये टार्डीग्रेडसह अन्य सूक्ष्मजीव असतात. वाढत्या इकोटूरिझम आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे अधिवास धोक्यात आले आहेत. या अधिवासांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन केले पाहिजे, अन्यथा या प्रजाती शोधण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.’

हेही वाचा: आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरू

‘टार्डीग्रेड’ सूक्ष्मजीवाची वैशिष्ट्ये...

  • वातावरणातील बदलांचा अंदाज घेत आपल्या शरीररचनेत बदल करतो.

  • योग्य वातावरण होईपर्यंत अनेक वर्षे सूक्ष्मजीव सुप्त अवस्थेत राहतो.

  • सुप्त अवस्थेतून बाहेर येताना, तो पूर्ववत अवस्थेतच बाहेर येतो.

  • पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डबक्यांमध्ये हा सूक्ष्मजीव आढळतो.

पृथ्वीला पर्यायी ग्रह शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. परग्रहावर एखादा जीव जिवंत राहू शकेल का, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून हा सूक्ष्मजीव भविष्यात उपयोगी ठरू शकतो. त्यामुळेच या सूक्ष्मजीवाविषयी अभ्यास होणे गरजेचे आहे.

- कल्याणी भाकरे, संशोधक, प्राणिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थिनीने केलेला अभ्यास हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संशोधकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image
go to top