पदभार स्वीकारताच एएसपी मीना यांच्याकडून अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मीना यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गुन्हे पथकाला अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

बारामती शहर : अधिकारी बदलला की कामाची पद्धतही बदलते याचा अनुभव सध्या पोलिस विभाग घेतोय. अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी जयंत मीना यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. तरुण आणि आयपीएस अधिकारी असलेल्या मीना यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गुन्हे पथकाला अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.

केवळ कारवाईचे निर्देशच देऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी स्वत: दैनंदिन या कारवाईचा आढावा घ्यायला प्रारंभ केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षकच अवैध व्यवसायाच्या विरोधात उभे ठाकल्याने सर्वच पोलिस ठाण्यातून कारवाईच्या धडाधड बातम्या येऊ लागल्या. हातभट्टी, जुगार, मटका, वेश्याव्यवसाय यांसारख्या दहा मोठ्या कारवाया गेल्या आठवड्यात झाल्या. 

पोलिस हातभट्टी उद्धवस्त करत असल्याच्या बातम्या पसरल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही यात लक्षणीय असल्याने या व्यवसायांवर अंकुश आणण्यासाठी जयंत मीना यांनी कंबर कसल्याचे जाणवत आहे. 

गेल्या आठवड्यात विविध कारवायांदरम्यान जवळपास चाळीस जणांवर विविध गुन्हे दाखल झाले. या कारवाईचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झालेली असली तरी अठरा पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची झोप या कारवाईने उडाली असून, आपल्या हद्दीत अवैध व्यवसाय होणार नाहीत. याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिस कर्मचाऱ्यांना दिले गेल्याची माहिती समोर येत आहे. 

Web Title: Additional SP Meena has Given order to take Action on Illegal Business