बारामतीतील या हाॅस्पीटलांमधील 50 टक्के खाटा प्रशासनाकडे 

मिलिंद संगई
Monday, 10 August 2020

बारामती शहर व तालुक्यात वाढू लागलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी बारामतीतील खासगी 41 रुग्णालयांमधील 50 टक्के खाटा या रुग्णालयांनीच प्रशासनाला उपलब्ध करून द्याव्यात 

बारामती (पुणे) : बारामती शहर व तालुक्यात वाढू लागलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी बारामतीतील खासगी 41 रुग्णालयांमधील 50 टक्के खाटा या रुग्णालयांनीच प्रशासनाला उपलब्ध करून द्याव्यात, जर त्या दिल्या नाहीत, तर प्रशासन या खाटा अधिग्रहित करेल, असा निर्णय आज झाला. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. कोणताही रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी आला, तर त्याला वैद्यकीय सेवा नाकारली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन कांबळे यांनी केले. दरम्यान, संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने देखील आता शहरातील खासगी रुग्णालयांनी संकलित करून ते तपासणीसाठी रुई येथे पाठवण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. त्यामुळे रुई येथे येणारा ताण आपोआपच कमी होणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
शहरात ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल होतात, अशा जवळपास 41 रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली असून, त्यापैकी निम्म्या जागा कोरोना व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. या रुग्णालयांच्या पाच रुग्णवाहिका देखील अधिग्रहित करण्यात आल्या असून, त्या कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांना बेड उपलब्ध होतील, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणेकरांच्या आठवड्याची सुरवात ट्रॅफिक जॅमने

दरम्यान, उद्यापासून या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. कोणत्याही रुग्णावर उपचार कोणीही नाकारायचे नाहीत, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. बारामतीतील या 41 रुग्णालयात कोणत्या रुग्णाला दाखल करुन घ्यायचे, याचा निर्णय कोरोना संनियंत्रण समिती घेणार आहे. या समितीचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच रुग्णाला दवाखान्यात दाखल होता येणार आहे. 

बारामतीतील मृतांचा आकडा 18  
बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आजही वाढला. शहरात घेतल्या जाणाऱ्या नमुन्यांपैकी अनेक जण बाधित असल्याचे दिसत आहे. एकाच कुटुंबातील बाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्याने प्रशासन चिंतेत आहे. आज दिवसभरात घेतलेल्या 82 नमुन्यांपैकी 12 जण पॉझिटीव्ह आढळले असून, अजून 22 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 267 वर जाऊन पोहोचला. आज मिळालेल्या रुग्णांमध्ये बारामती शहरातील आठ, तर ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील पणदरे येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration will take over 50 per cent of the beds in 41 hospitals in Baramati