लोणी काळभोरसह सात गावातील विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 20 जुलै 2018

ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून रुरबन अभियान अंतर्गत लोणी काळभोर गावसमुहामध्ये लोणीकाळभोरसह सोरतापवाडी, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची, तरडे, कुंजीरवाडी व वळती या सात गावांचा समावेश करण्यात आला आहे.

लोणी काळभोर - श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह सात गावातील १७ विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामासाठी पहिला हप्ता म्हणून १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये संबंधित विभागाकडे वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

यावेळी पाचर्णे म्हणाले, "ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून रुरबन अभियान अंतर्गत लोणी काळभोर गावसमुहामध्ये लोणीकाळभोरसह सोरतापवाडी, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची, तरडे, कुंजीरवाडी व वळती या सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व गावातील विकास कामांचा सुमारे २११ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. वरील सर्व गावांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर आगामी काळात पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते या कामांना सुरुवात केली जाणार आहे.

राष्ट्रीय रुरबन अभियानात मंजूर झालेल्या गावनिहाय विकास कामांची आकडेवारी (कंसात मंजूर झालेला निधी रुपयांमध्ये) - 
लोणी काळभोर - ६ (४३ लाख ५ हजार), शिंदवणे - १ (४ लाख ५० हजार), तरडे - ३ (१० लाख ५० हजार), आळंदी म्हातोबाची - २ (३३ लाख), सोरतापवाडी - २ (४५ लाख) व कुंजीरवाडी - ३ (४२ लाख).

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Administrative approval for various development works of seven villages along with Loni Kalbhor