अकरावीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; यंदा जागा वाढणार!

Admission_11thStd
Admission_11thStd

पुणे : "अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सध्या महाविद्यालयाची ऑनलाईन नोंदणी सूरू आहे. या नोंदणी दरम्यान अनेक महाविद्यालयांना नव्याने तुकड्या वाढवून मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही महाविद्यालये नव्याने नोंदणी करत आहेत. त्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशाच्या जागा वाढ होण्याची शक्यता आहे," अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जवळपास ३०५ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी आतापर्यंत २०२ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गावांमधील आतापर्यंत नव्या दोन कनिष्ठ महाविद्यायलाचे अकरावी प्रवेशासाठी प्रस्ताव आले आहेत. मात्र अकरावी प्रवेशाच्या नेमक्या किती जागा वाढतील, हे आताच सांगता येणार नाही. महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे शेंडकर यांनी नमूद केले.

एखाद्या महाविद्यालयातील तुकड्या वाढविण्यासाठी सरकार त्यांना मान्यता देते. त्यानुसार महाविद्यालयामार्फत ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड केली जातात. अशा महाविद्यालयांचा गेल्या वर्षीचा अर्ज आणि या वर्षीचा अर्ज तपासला जातो. ज्या महाविद्यालयांनी तुकड्या वाढविल्या आहेत, त्याची मान्यता तपासली जाते.

महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी करताना संबंधित महाविद्यालयातील प्रवेश क्षमता, सुविधा, ठरविलेल्या शुल्काची रचना अशी सविस्तर माहिती देण्यात येते. त्याशिवाय महाविद्यालयांना त्यांची आवश्यक कागदपत्रे ऑनलाईनद्वारे त्यांच्याच लॉगिनला अपलोड करायची आहेत. नोंदणी करताना महाविद्यालयांमार्फत भरलेला ऑनलाईन अर्ज आणि अपलोड केलेली कागदपत्रे यांची अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पडताळणी केली जाते. यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील ऑनलाईनच सोडविल्या जातात. त्यानंतर संबंधित महाविद्यायलातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

अकरावी प्रवेशावर 'लॉकडाऊन'चा परिणाम नाही
पुण्यात पुढील आठवड्यात पुन्हा लॉकडाऊन असला तरीही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थी किंवा शाळांमधील संबंधित कर्मचारी प्रवेशाच्या नोंदणीसाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. त्यामुळे विद्यार्थी असो वा महाविद्यालयातील संबंधित कर्मचारी यांना प्रवेशाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याची गरज पडणार नाही, असे शेंडकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविद्यालयांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका

"अनेक महाविद्यालये अगदी शेवटच्या दिवशी नोंदणी करत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. परिणामी नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सर्वर डाऊन होण्याची परिस्थिती ओढावते. त्यामुळे 
अकरावी केंद्रीय प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणीकरिता दिलेल्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यत वाट न पाहता, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी," असे आवाहन अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे करण्यात आले आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com