एसटी महामंडळाकडून पहा कशाच्या सुरू आहेत जाहिराती

मिलिंद संगई
Thursday, 28 May 2020

ज्या एसटीने कधीच मालवाहतुकीबाबत फारसा विचारही केलेला नव्हता, त्याच एसटी महामंडळाकडून आता केवळ मालवाहतूक सुरुच झाली नाही, तर अधिकाधिक मालवाहतूक होऊन अधिकचे उत्पन्न मिळावे, या साठी जाहिरातींद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. 

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटाने काळ कोणासाठी थांबत नसतो आणि काळ नेहमी एकसारखाही नसतो, याची पुरेपूर जाणीव सर्वांनाच करून दिली. सर्वच पातळ्यांवरील अनेक समीकरणे दोनच महिन्यात बदलून गेली. 

ज्या एसटीने कधीच मालवाहतुकीबाबत फारसा विचारही केलेला नव्हता, त्याच एसटी महामंडळाकडून आता केवळ मालवाहतूक सुरुच झाली नाही, तर अधिकाधिक मालवाहतूक होऊन अधिकचे उत्पन्न मिळावे, या साठी जाहिरातींद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. 

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

एसटीच्या बाबतीत जाहिरातीची त्यांना फारशी कधी गरजच पडली नाही, उलट एसटीच्या माध्यमातून अनेक जाहिरातदारांनी आपल्या जाहिराती करवून घेतल्या. आता मात्र मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक मालवाहतूक होऊन त्याद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळावे, या साठी एसटीच्या पातळीवर जाहिराती सुरु करण्यात आल्या आहेत. 

- Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा झाला त्रास!

स्थानिक पातळीवर समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत एकही रुपया खर्च न करता एसटीचे अधिकारी मालवाहतुकीसाठी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपल्या विविध वैशिष्टयांची माहिती देत विश्वासार्हता व वेळेवर तसेच माफक दरात सेवा, अशा मुद्यांचा या जाहिरातीत समावेश केला गेला आहे. 

एसटीच्या वतीने अडचणींवर मात करण्यासाठी आता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे, त्याचाच ही मालवाहतूक एक भाग आहे. ती अधिक प्रभावी व्हावी व त्यातून उत्पन्न मिळावे, या साठी अधिकाऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advertisements for freight, not passenger, from ST