विकास आराखड्यासाठी सल्लागार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या ८३२ हेक्‍टर जागेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली; तसेच या प्रकल्पासाठीचे व्यवस्थापन कार्यालय पुण्यात स्थापन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. 

मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री तथा कंपनीचे अध्यक्ष फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या वेळी सामान्य प्रशासन विभाग (नागरी हवाई वाहतूक) प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक कविता गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन आदी या वेळी उपस्थित होते. त्या बैठकीत सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे २ हजार ८३२ हेक्‍टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. २ हजार ८३२ हेक्‍टरपैकी २ हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम यापूर्वीच कंपनीकडून ‘डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित ८३२ हेक्‍टर जागेवर विमानतळासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली. त्याचबरोबर या विमानतळाच्या कामासाठी पुणे येथे व्यवस्थापन कार्यालय सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. या कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी, नगररचनाचे अधिकारी यांच्यासह महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Advisor for development plan