भारताच्या 'शुक्रयान'कडे वळल्या जगाच्या नजरा; शुक्रावर जाणारी जगातील एकमेव मोहीम!

ISRO_Shukrayaan
ISRO_Shukrayaan

पुणे : सोमवारी (ता.14) रात्री खगोलशास्त्रज्ञांनी पत्रकार परिषद घेत शुक्र ग्रहावर 'फॉस्फिन' नावाचे जैविक संयुग सापडल्याचे घोषित केले. आणि जगभरातील अवकाश संशोधन संस्थांच्या नजरा पुन्हा एकदा शुक्राकडे वळल्या आहे. भारतासह अमेरिका आणि रशियाच्या आगामी काळात शुक्रमोहिमा आहेत. मात्र, सर्वात नजीकच्या काळात 2023 मध्ये शुक्रावर जाणारी आणि सध्या अंतिम योजनेच्या प्रतिक्षेत असलेल्या भारताच्या 'शुक्रयान-1'कडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.

शुक्राचे महत्त्व का वाढले? 
पृथ्वीच्या जवळचा ग्रह असलेल्या शुक्रावर वातावरण असून, त्यामध्ये प्रथमच जैविक घटक सापडला आहे. एक फॉस्फरस आणि तीन हायड्रोजन अणूपासून बनलेला 'फॉस्फिन' हे संयुग सूक्ष्मजीवांच्या जैविक अभिक्रियेतून तयार होते. रंगहीन असलेले हे संयुग विषारी आहे. पर्यायाने जीवसृष्टीच्या संभाव्य पाऊलखुणा शोधण्यासाठी संपूर्ण सूर्यमालेत शुक्र ग्रह महत्त्वपूर्ण बनला आहे.

कशी असेल पुढच्या संशोधनाची दिशा? 
कार्डिफ विद्यापीठाच्या प्रा. जेन ग्रीव्हज यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने हवाई येथील जेसीएमटी आणि चिली येथील अल्मा या दुर्बिणीच्या साहाय्याने फॉस्फिनची पुष्टी केली आहे. पृथ्वीच्या तुलनेत शुक्राच्या वातावरणात सापडलेल्या या संयुगाचे प्रमाण खूप जास्त आहे.

क्‍योट्यो विद्यापीठाचे प्रा. हिडियो सगावा म्हणतात, "फॉस्फिनची निर्मिती जैविक अभिक्रियेने झाली का, हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष शुक्रावर यान सोडावे लागेल.'' शुक्रावरील वातावरण पृथ्वीसारखे शांत नसून प्रचंड उलथापालथ आणि आम्लाचे ढग असलेले आहे. तसेच सूर्यापासून शुक्र तुलनेने जवळ असल्याने यान उतरवण्याचे मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. 

शुक्रयान -1 
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 2023मध्ये 'शुक्र' ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी 'शुक्रयान-1' ही मोहीम आखली आहे. नजीकच्या काळात शुक्रावर जाणारी सध्या तरी एकमेव मोहीम असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. शुक्राच्या वातावरणातील ढगांमध्ये सुक्ष्मजीवांची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 40 किलोमीटर अंतरावर सूक्ष्मजीव सापडल्याचे नासाच्या अवकाश मोहिमांतून तसेच इस्रोच्या 'बलून प्रयोगा'तून सिद्ध झाले आहे. पर्यायाने शुक्राच्या बाबतीतही ही पाहणी करण्यात येईल. साधारणपणे 100 किलोग्रॅमचा पेलोड नेणाऱ्या या मोहिमेत भारतासह आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांचे पेलोड असतील. कोरोनाच्या काळातील लॉकडाउनचा परिणामही या मोहिमेवर होण्याची दाट शक्‍यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे. 

शुक्राच्या वातावरणात फॉस्फिन सापडल्यामुळे सर्वांनाच पुढील संशोधनाची उत्सुकता आहे. इस्त्रोच्या येऊ घातलेल्या शुक्रयान मोहिमेत तेथील वातावरणाच्या अभ्यासासाठीचे उपकरणे असतील आणि यातून नवीन संशोधन पुढे येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
- डॉ. सोमक रायचौधरी, संचालक, आयुका.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com