दिवाळीनंतर पुणेकरांना एकवेळ पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिवाळीनंतर एकच वेळ पाणीपुरवठा होणार आहे. गरजेपेक्षा दोनशे एमएलडी पाणी कमी मिळणार असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलसंपदा विभागाकडून साडेअकराशे ‘एमएलडी’ पाणी मिळणार असून, एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक तयार केले आहे.

पुणे - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिवाळीनंतर एकच वेळ पाणीपुरवठा होणार आहे. गरजेपेक्षा दोनशे एमएलडी पाणी कमी मिळणार असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलसंपदा विभागाकडून साडेअकराशे ‘एमएलडी’ पाणी मिळणार असून, एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक तयार केले आहे.

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली. कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराला ११५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरजेपेक्षा कमी पाणीपुरवठा होणार असल्याने उपलब्ध पाण्याच्या वाटपाचे नियोजन करण्यासाठी एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करणार नाही, असा सत्ताधारी पक्षाचा दावा खोटा ठरला. 

वीस वर्षांपूर्वी महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार साडेअकराशे एमएलडी एवढेच पाणी देण्यात येणार आहे. वास्तविक, शहराचा वाढलेला विस्तार आणि लोकसंख्या याचा विचार करता पुण्याला प्रतिदिन साडेतेराशे एमएलडीहून अधिक पाण्याची गरज आहे. सध्या साडेतेराशे एमएलडी इतके पाणी पुण्याला मिळत असून, ते दिवाळीपर्यंत मिळेल. त्यानंतर शहराला ११५० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. यामुळे एकच वेळ पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक तयार करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे.

Web Title: After Diwali Pune City get one time water