पुण्यात २०७ टक्के जास्त पाऊस; मुंबईखालोखाल परतीचा पाऊस पुणे जिल्ह्यात बरसला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

राज्याच्या बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडला. हा सर्वाधिक पाऊस मुंबईमध्ये तर, त्यानंतर पुण्यात पडला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुणे - राज्यात मुंबईखालोखाल परतीचा पाऊस पुणे जिल्ह्यात बरसला. गेल्या २९ दिवसांमध्ये मुंबईत सरासरीच्या तुलनेत २३३ टक्के, तर पुण्यात २०७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली.

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) भारतातून परत फिरल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात पुण्यात पडलेल्या पावसाचा आढावा ‘सकाळ’ने घेतला. त्यातून ही माहिती पुढे आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत गेल्या वर्षी २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या २९ दिवसांमध्ये ३१२.४ मिलिमीटर पाऊस पडला. यादरम्यान पुण्यात सरासरी ८० मिलिमीटर पाऊस पडतो. पुणे जिल्ह्यात या महिन्यात सरासरी ७६.९ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो २३६.२  मिलिमीटर (२०७ टक्के) झाला. याच कालावधीत मुंबईत २१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हा २३३ टक्के जास्त होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

का पडला पाऊस
परतीचा मॉन्सून महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दाखल झाला. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांश भागात ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस पडला. हा सर्वाधिक पाऊस मुंबईमध्ये तर, त्यानंतर पुण्यात पडला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

राज्यात ७१ टक्के पाऊस
ऑक्‍टोबरमध्ये राज्यात ७१ टक्के पाऊस पडला. महाराष्ट्रात ऑक्‍टोबरच्या २९ दिवसांमध्ये सरासरी ६९.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तो ११९.७ मिलिमीटर पडला आहे. त्यातही सर्वाधिक पाऊस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या हवामान उपविभागात पडला. कोकणात सरासरीच्या तुलनेत १२२ टक्के तर मध्य महाराष्ट्रात ११७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. मराठवाड्यात ५१ टक्के पाऊस पडला. मात्र, विदर्भात सरासरीपेक्षा १६ टक्के पाऊस कमी पडल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली. 

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

असा पडला महिनाभरात पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)
शिवाजीनगर .... ३१२.४
लोहगाव .......... ३०८.३
पाषाण ............. ३१९.३

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

पावसाची उघडीप
मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. त्यामुळे शहर आणि परिसरातील हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ८८ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. पुढील चोवीस तासांमध्ये ते ७८ पर्यंत खाली जाईल. पुढील आठवड्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने शहरातून पावसाने उघडीप दिली. कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून, किमान तापमान पुढील दोन दिवसांमध्ये १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल. त्यामुळे रात्री हवेतील गारठा वाढेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Mumbai the return rain fell in Pune district 207 percent more rain in Pune