video : तो अडकला सात तास इंद्रायणीत

विलास काटे
रविवार, 28 जुलै 2019

इंद्रायणी नदीकिनारी हातपाय धुण्यासाठी गेलेली व्यक्ती पाय घसरून नदीच्या पाण्यात पडली आणि पुरात वाहू लागली. रात्रभर सुमारे सात तास पाण्यातील समाधीला धरून बसली. सकाळी स्थानिक लोकांनी आणि पोलिसांच्या मदतीने मानवी साखळी करून त्यांची सुटका केली.

आळंदी - इंद्रायणी नदीकिनारी हातपाय धुण्यासाठी गेलेली व्यक्ती पाय घसरून नदीच्या पाण्यात पडली आणि पुरात वाहू लागली. रात्रभर सुमारे सात तास पाण्यातील समाधीला धरून बसली. सकाळी स्थानिक लोकांनी आणि पोलिसांच्या मदतीने मानवी साखळी करून त्यांची सुटका केली.

संजय गजानन कंडरकर (वय 50, रा. भोसरी) असे पुरात अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कंडरकर हे नदीत हातपाय धुण्यासाठी गेले होते, तेव्हा अचानक तोल गेला आणि पुराच्या पाण्यात अडकले. जीव वाचविण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, धडपड निष्फळ ठरली. त्यानंतर घाटावरील एका समाधीला घट्ट पकडून बसले. पाण्याची पातळी दगडी घाटावर जास्त नव्हती. मात्र, पाणी वाहते असल्याने वाहून जाण्याची शक्‍यता होती. रात्रीची वेळ असल्याने घाटावरील पोलिसांनाही अंधारात दिसले नाही. सात तासांच्या अंतराने सकाळी साडेपाचच्या दरम्यान स्थानिक नागरिकांना बुडणारी व्यक्ती दिसली आणि त्यांनी पोलिसांना कळविले. नंतर पोलिसांनी मानवी साखळी करून कंडरकर यांना बाहेर काढले. अक्षय त्रिभुवन, विलास पवार, तुळशीराम कोळपे, पद्माकर श्रीरामे, संजय पवार, सुरेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.

याबाबत आळंदी पोलिसांनी सांगितले, की कंडरकर यांच्याशी विचारपूस केल्यावर कळले की कौटुंबिक कलहामुळे रात्रीच्यावेळी ते आळंदीत आले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पुरात अडकले. सकाळी त्यांची पत्नी पोलिस ठाण्यात आल्यावर त्यांना त्यांच्या स्वाधीन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After seven hours Rescue From Indrayani