Agnipath Scheme : उठा... अग्निवीर हो... सज्ज व्हा, उठा चला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agnipath Scheme

Agnipath Scheme : उठा... अग्निवीर हो... सज्ज व्हा, उठा चला

पुणे : संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सशस्त्र दलात भरतीसाठी आयोजित अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेल्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला पुण्यात सुरुवात झाली आहे.

सोमवारी (ता. २) खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) तसेच दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील काही केंद्रांमध्ये अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. दक्षिण मुख्यालयाने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे.

जोश आणि उत्साहाने भरलेल्या या अग्निवीरांना बीईजीच्या प्रमुखांनी राष्ट्रसेवेचा प्रवास सुरू करताना प्रामाणिकपणा आणि सन्मानाने देशसेवेची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कराच्या पुणे भरती केंद्राद्वारे आठ भरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात एक मेळावा हा महिला उमेदवारांसाठी होता. पुण्यासह नाशिक आणि हैदराबाद येथील आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणाला आता सुरुवात झाली आहे. प्रशिक्षणासाठी बंगळुरू येथील सैन्य पोलिस दलात (सीएमपी) पोहोचलेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत महिलांचाही समावेश आहे.

संरक्षण मंत्रालयाने जून २०२२ मध्ये अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. या अग्निवीरांना ३१ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये लष्करात दाखल केले जाईल. प्रारंभिक नियुक्ती चार वर्षांसाठी असली तरी अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील सुमारे २५ टक्के अग्निवीरांना सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये दाखल केले जाईल. त्यानंतर त्यांना १५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागेल.

‘अग्निपथ’ संरक्षण क्षेत्राचे चित्र बदलणारी योजना

अग्निपथ ही सशस्त्र दलांसाठी संपूर्ण चित्र बदलणारी एक योजना आहे. ती भारतीय सैन्यदलाला तरुण, उच्च-तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक दृष्टिकोनासह जगातील सर्वोत्कृष्ट दल बनवण्यासाठी मोठी शक्ती म्हणून काम करणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.

मंगळवारी (ता. ३) नवी दिल्ली येथे ‘शिक्षण मंत्रालय (एमओई) आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालयासोबत (एमओएसडीई) झालेल्या सामंजस्य करार हस्तांतर समारंभात दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणावेळी ते बोलत होते.

या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने अग्निवीर त्यांचे शिक्षण वेळेत पूर्ण करू शकतील आणि अतिरिक्त गुण आणि कौशल्ये विकसित करू शकतील, असे ते म्हणाले.