
विवाहप्रसंगी वधू-वरांमध्ये चक्क करारनामा; सोशल मीडियावर व्हायरल!
मंचर : पूर्वी सात जन्म हाच पती मिळावा म्हणून नवरी मुलगी देवाकडे प्रार्थना करत असायची. आता काळानुसार सर्वच काही बदलत चालला आहे. आता तर थेट विवाहपूर्वीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार नामा तयार केला जात आहे.
करारनाम्यावर वधू-वराप्रमाणेच मित्र मैत्रिणीच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतल्या जात आहेत. अशाच पद्धतीचा विवाह आंबेगाव तालुक्यातील एकलहरे (ता.आंबेगाव) येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात लंबे व ताजणे कुटुंबातील वधू-वरांमध्ये नुकताच झाला.
या करारनाम्याची सोशल मीडियावरजोरदार चर्चा सुरू असून या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत केले जात आहे. आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील सुवर्णा संदीप लंबे यांचे चिरंजीव व नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सविता सुनील ताजणे यांची कन्या यांच्या विवाहप्रसंगी प्रथम दोघांनी केलेल्या करारनाम्याचे वाचन करण्यात आले.
दोघांच्याही स्वाक्षऱ्या झाल्यानंतर मित्र-मैत्रिणी स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर उपस्थित त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. करारनाम्याचे छायाचित्र मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
वर कृष्ण हे सिडकोचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजिंक्य पडवळ यांचे भाचे व आदर्श गाव गावडेवाडीतील पहिले इंजिनियर( स्व)शंकरराव लंबे यांचे नातू आहेत. वधू वर राज्य लोकसेवा आयोगपरीक्षेची तयारी करत आहेत.
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव काळे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय काळे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजू वाळूंज, आंबेगाव तालुका शिवसेना प्रमुख अरुण गिरे, आदर्शगाव गावडेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच स्वरूप ऋषिकेश गावडे, माजी सरपंच देवराम गावडे आदी मान्यवरांनी वधुवराना शुभेच्छा दिल्या.
करारनाम्यातील मुद्दे
कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल.
मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल
सायली : मी कृष्णाकडे शॉपींगसाठी हट्ट धरणार नाही.
मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीला जायला आडवणार नाही. (महिन्यातुन दोन वेळा)
मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल.
आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.