कृषी विभागावर आत्मपरीक्षणाची वेळ 

farmer
farmer

खेड शिवापूर (पुणे) : पीक लागवडीपासून काढणीपर्यंत पीक संगोपनच्या विविध गोष्टींसाठी शेतकरी आता खासगी कृषी समुपदेशकांची मदत घेऊ लागले आहेत. सरकारचा कृषी विभाग असताना शेतकऱ्यांना पैसे मोजून पीक व्यवस्थापनाच्या सल्ल्यासाठी खासगी समुपदेशकांची मदत का घ्यावी लागते? कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास कमी पडतो आहे का? याचा कृषी विभागाने विचार करण्याची आवश्‍यकता आहे. 

अनेक शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक पिकांव्यतिरिक्त वेगवेगळी पिके घेतात. वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून शेतात विविध प्रयोग करतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. त्यासाठी आता अनेक शेतकरी आपल्या शेतातील विविध पिकांच्या संगोपनासाठी खासगी कृषी समुपदेशकांची मदत घेत आहेत. 

खासगी समुपदेशक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर भेट देतात. शेतातील पिकांची पाहणी करून पिकावर औषध फवारणी कधी करायची, कोणती खते द्यायची? आदी गोष्टींचे वेळापत्रक लिहून देतात. प्रत्येक भेटीसाठी या समुपदेशक फी आकारत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीवर सरकारचा कृषी विभाग असताना शेतकऱ्यांना पैसे खर्च करून खासगी समुपदेशकांची मदत का घ्यावी लागते? कृषी विभागाचा शेतकऱ्यांशी नसलेला संवाद आणि निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना खासगी कृषी समुपदेशकांकडे वळावे लागत आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

""कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे आणि योजनांपुरतेच गावात येतात. त्यामुळे पीक सल्ला आणि मार्गदर्शन या खूप दूरच्या गोष्टी आहेत. कधी वरिष्ठ कृषी अधिकारी आल्यावर मात्र त्या अधिकाऱ्यांना वेगळ्या प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतात आणले जाते. खरीप आणि रब्बी पिके सोडली; तर इतर पिकांसाठी कृषी विभागाकडून पुरेसे आणि वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे आम्हाला खासगी कृषी समुपदेशकांचा सल्ला घ्यावा लागतो,'' असे अनेक शेतकऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले. 
याबाबत कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र संबंधित कृषी अधिकारी महत्त्वाच्या बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

खते व औषध विक्रेतेच सल्लागार 
शेतातील पिकावर नक्की कोणते औषध फवारावे, कोणती खते द्यावीत, त्याचे प्रमाण किती? याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे खते आणि औषध विक्रीच्या दुकानात जाऊन संबंधित दुकानदाराच्या सल्ल्याने शेतकरी पिकांना औषध आणि खते देतात.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com