कळंब परिसरात शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

महाळुंगे पडवळ - डिंभे धरणातून घोड नदीत सोडलेल्या  पाण्यामुळे घोड नदी दुथडी वाहत आहे. कळंब येथे पाणी शेतात शिरल्यामुळे ऊस पीक जलमय झाले असून, कानडे वस्तीकडे जाणारा रस्ता पोखरला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी कळंब ग्रामस्थांनी केली आहे.

महाळुंगे पडवळ - डिंभे धरणातून घोड नदीत सोडलेल्या  पाण्यामुळे घोड नदी दुथडी वाहत आहे. कळंब येथे पाणी शेतात शिरल्यामुळे ऊस पीक जलमय झाले असून, कानडे वस्तीकडे जाणारा रस्ता पोखरला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी कळंब ग्रामस्थांनी केली आहे.

कळंब येथील घोड नदीला गुरुवारी (ता. १६) आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावरून बबनराव कानडे यांच्या शेतात घुसले. त्यांनी शेतात नुकतीच उसाची लागवड केली होती. ऊस शेती पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, तुकाराम कानडे व राजेंद्र कानडे यांच्याही ऊस पिकात पाणी शिरले आहे. तीनही शेतकऱ्यांचे प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. कानडे वस्ती व वेताळमळा वस्तीकडे जाणारा रस्त्याचेही पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाले. येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. गेल्या वर्षी येथील रस्त्याच्या मोरीचे नुकसान झाले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय ऊर्फ गंगा काळे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम कानडे, शरद बॅंकेचे माजी संचालक तुकाराम कानडे, दशरथ कानडे व गणेश कानडे आदींनी केली.

पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे म्हणाल्या, ‘‘पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. नजीकच्या काळात परिसरात रस्त्याच्या कडेला भिंत बांधण्यात येणार आहे.

त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे रस्त्याचे नुकसान टळण्यास मदत होईल. या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.’’ 

चास (ता. आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराला रात्री पाण्याने वेढा दिला होता. तसेच, परिसरात असलेली छोटी दोन मंदिरे पाण्यात गेली होती. चास, वडगाव काशिंबेग, कळंब आदी ठिकाणी घोड नदीवर असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या मोटारी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Agriculture loss by ghod river flood