शेतमालाच्या थेट विक्रीसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणात योजना 

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - महाराष्ट्र राज्याप्रमाणेच आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांत शेतमालाच्या थेट विक्रीसाठी अनुक्रमे "रायतू बाजार' आणि "आपला भाजीपाला' (अवर व्हेजिटेबल) ही योजना राबविली जात आहे. यांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, येथील घाऊक बाजारात मध्यस्थांमार्फत शेतमालाची विक्री केली जात आहे. शेतमालाच्या थेट विक्रीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांत राबविल्या जाणाऱ्या या योजनांची पाहणी करण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकताच अभ्यास दौरा केला.

पुणे - महाराष्ट्र राज्याप्रमाणेच आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांत शेतमालाच्या थेट विक्रीसाठी अनुक्रमे "रायतू बाजार' आणि "आपला भाजीपाला' (अवर व्हेजिटेबल) ही योजना राबविली जात आहे. यांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, येथील घाऊक बाजारात मध्यस्थांमार्फत शेतमालाची विक्री केली जात आहे. शेतमालाच्या थेट विक्रीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांत राबविल्या जाणाऱ्या या योजनांची पाहणी करण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकताच अभ्यास दौरा केला.

महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन वर्षांपासून शेतमालाच्या विक्रीसाठी "शेतकरी ते ग्राहक' ही योजना राबविली. शेतकऱ्यांचे गट स्थापून विविध शहरांत शेतमालाची विक्री केंद्रे सुरू केली. ही योजना अपयशी ठरू लागल्याने पणन मंडळाने "आठवडे बाजार' सुरू केले. याला अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न नियमनात बदल करून सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाची थेट विक्री करण्यास परवानगी दिली. या पार्श्‍वभूमीवर शेतमालाच्या थेट विक्रीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची पाहणी करण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने अभ्यास दौरा केला. या दोन्ही राज्यांत शेतमालाच्या थेट विक्रीची योजना राबविली जात असली, तरी मध्यस्थांची साखळी तेथेही कायम आहे. 

आंध्र प्रदेशातील "रायतू बाजार' 
पंजाब राज्यातील "अपना बाजार'च्या धर्तीवर 1999 सालापासून आंध्र प्रदेशात "रायतू बाजार' ही संकल्पना राबविली जात आहे. राज्यात एकूण 84 रायतू बाजार आहेत. त्यापैकी पाच बाजार विजयवाडा जिल्ह्यात असून, येथील स्वराज मैदानावरील रायतू बाजार सर्वांत मोठा आहे. 
या बाजाराचे प्रमुख रमेश बाबू म्हणाले, ""येथील गाळे आणि जागेपैकी 75 टक्के जागा ही शेतकऱ्यांना दिली जाते. उर्वरित जागा शेतमालाची विक्री करण्यासाठी सहकारी संस्था, बचत गट, शेतकऱ्यांच्या संस्थांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अल्पदराने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली जाते. घाऊक बाजारातील भावानुसार येथील दर ठरविले जातात. येथे माल विक्रीला आणण्यासाठी शेतकऱ्याला ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. शेतकऱ्याच्या पिकासोबत त्याचे छायाचित्र काढून घेतले जाते. ही कागदपत्रे तहसीलदारांकडे गेल्यानंतर तेथे त्याला माल विक्री करण्याचे ओळखपत्र (परवाना) दिले जाते. त्याने उत्पादित केलेल्या पिकाच्या कालावधीपुरताच हा परवाना असतो.'' 

वैशिष्ट्य ः 
* बाजारातील फलकावर भाजीपाल्याचे भाव 
* सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत बाजार सुरू 
* रास्त भावात भाजीपाला विक्री 

तेलंगणातील "आपला भाजीपाला' 
तेलंगण राज्यात 31 ठिकाणी "आपला भाजीपाला' विक्री योजनेची केंद्रे आहेत. येथे शेतमालाची प्रतवारी आणि पॅकिंग करून विक्री केली जाते. यासाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. बाजारभावावर येथील बाजार समितीचे नियंत्रण असते. गेल्या दोन वर्षांत या केंद्रातून सुमारे 18 कोटी रुपयांची उलाढाल झाली. सिकंदराबाद येथील "डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हेजिटेबल मार्केट यार्ड' (बोवनपल्ली) येथे हे केंद्र उभारले आहे. 
याविषयी पणन उपसंचालक वाय. जे. पद्मा हर्षा म्हणाल्या, ""घाऊक बाजाराच्या आवारातील या केंद्रात दोन शीतगृहे असून, त्याची साठवण क्षमता 4 मेट्रिक टन आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत "आपला भाजीपाला' योजनेसाठी मिळालेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून येथे पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी जागेवर ही विक्री केंद्रे चालविली जातात.'' 

वैशिष्ट्ये ः 
* बार कोड असलेल्या "पॅकिंग'मध्ये शेतमालाची विक्री 
* सहज स्थलांतरित करता येतील अशा पद्धतीने केंद्राची उभारणी 
* साडेसात हजार शेतकरी सहभागी 

Web Title: Agriculture produce to sell directly to Andhra Pradesh, Telangana plan