पुणे जिल्ह्यात तीस हजार ग्रामरक्षक दलाचे जवान तयार करण्याचे उद्दीष्ट

मिलिंद संगई
शनिवार, 12 मे 2018

बारामती (पुणे) : जिल्हा पोलिसांच्या मदतीसाठी या पुढील काळात पुणे जिल्ह्यात तीस हजार ग्रामरक्षक दलाचे जवान तयार करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

बारामती (पुणे) : जिल्हा पोलिसांच्या मदतीसाठी या पुढील काळात पुणे जिल्ह्यात तीस हजार ग्रामरक्षक दलाचे जवान तयार करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

पोलिसांचे अपुरे संख्याबळ असल्याने पोलिसांच्या मदतीसाठी प्रत्येक गावातून किमान पंधरा युवकांना ग्राम रक्षक दलात सहभागी करुन घेण्यात येणार असून त्यांना पोलिस विभागाकडून ओळखपत्र दिले जाईल. या शिवाय त्यांना लाठी काठीचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना शिट्टीही दिली जाणार आहे. रात्रीच्या गस्तीसह पोलिसांना विविध प्रकारच्या तपासाच्या कामासह इतरही ठिकाणी हे युवक मदत करणार आहेत. 

दरम्यान लोकसहभागातून प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचाही मनोदय सुवेझ हक यांनी व्यक्त केला असून काही गावात असे कॅमेरे बसविण्यातही आले आहेत. मात्र प्रत्येक गावात किमान एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा मोक्याच्या जागी असला पाहिजे, असा प्रयत्न पोलिस करीत आहेत. 
पोलिसांच्या घरांसाठीही प्रस्ताव पुणे जिल्ह्यात इंदापूर, सासवड, जेजुरी, भोर यासह काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांसाठी आठशे घरांना पोलिस हाऊसिंग कार्पोरेशनने मंजूरी दिली आहे. पुढच्या टप्प्यात बारामतीसह इतरही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत उर्वरीत घऱांसाठी प्रस्ताव असून प्रत्येक पोलिसाला घर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बारामतीत सध्याच्या पोलिस लाईनमध्ये सहा ते सात मजली इमारती उभारून तेथे काही बांधकाम व्यावसायिकांशी बोलून कमी दरात पोलिसांना घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे सुवेझ हक यांनी सांगितले.

Web Title: aim to produce pune district 30 thousand gramrakshak