बागायती क्षेत्र वगळण्यास एअरपोर्ट ऍथॉरिटी अनुकूल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेतून गावठाण आणि बागायती क्षेत्र वगळण्यास एअरपोर्ट ऍथॉरिटीने अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेनंतरच त्यासंदर्भात विचार करता येईल, असे शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत ठरले. तसे झाल्यास या गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

नियोजित विमानतळासाठी सुमारे 2400 हेक्‍टर जागा लागणार आहे. पुरंदर तालुक्‍यातील या जागेचे एअरपोर्ट ऍथॉरिटीने "ओएलएक्‍स' सर्वेक्षण करून घेतले असून निश्‍चित केलेल्या जागेपैकी तीस टक्के जागा हे बागायती क्षेत्र आहे. काही गावांचे गावठाणही त्यामध्ये येते. ते यातून वगळावे, अशी मागणी होत आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीदेखील तशी मागणी केली होती. 

मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. या बैठकीस विमानतळाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिलेल्या जर्मन येथील डार्स कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या तांत्रिक समितीने गावठाण आणि बागायती क्षेत्र वगळता येऊ शकते, यास अनुकूलता दर्शविली आहे. 

...त्या जागेत बदल शक्‍य 
विमानतळ धावपट्टीच्या जागेत कोणताही बदल होऊ शकत नाही. मात्र, परिसरात उभारण्यात येणाऱ्या कार्गो व अन्य सुविधांच्या जागेत बदल करता येऊ शकतो. त्यासाठी या गावांमध्ये असलेल्या गायरान जमिनींचा वापर करता येईल का, याचा विचार होऊ शकतो. मात्र विमानतळाच्या जागेस संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर याबाबत विचार करता येऊ शकेल, असे एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Airport Authorization friendly